![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० मे २०२६ ।।महाराष्ट्रात सध्या आभाळाने जणू दोन वेगवेगळे मुखवटे चढवले आहेत. एका हातात अंग भाजणारा उन्हाचा तवा, तर दुसऱ्या हातात ढगांचा पाण्याने ओथंबलेला घडा! मे महिन्याच्या तापलेल्या अंगारावर आता पावसाच्या सरींची अचानक बरसात होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. १४ मे ते २० मेदरम्यान राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या मध्यावरच मान्सूनपूर्व पावसाने राज्याला झोडपून काढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काही भागांत आधीच ढगांनी दार ठोठावले असून पुढील आठवड्यात या पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला हा पाऊस थोडासा दिलासा देईल खरा; पण त्याचवेळी गारपीट, वादळी वारे आणि विजांचा कडकडाट यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या कपाळावर चिंतेच्या रेषाही उमटल्या आहेत.
कोकणात ढगांचा मोर्चा, विदर्भात वाऱ्यांचा फटका!
हवामान विभागाने कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. समुद्रकिनाऱ्यालगत उष्ण वारे वाहणार असून काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ढगांचा हा रौद्र अवतार पाहता निसर्गाने जणू उन्हाळ्यालाच आव्हान दिले आहे. धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांत गारपीटीची दाट शक्यता असून नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम सरी बरसतील. मध्य महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यात वाऱ्यांचा वेग वाढणार असून विजांचा कडकडाटही ऐकू येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
संगमेश्वरात पावसाचा धिंगाणा, बाजारपेठेची तारांबळ!
रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसाने सलग तिसऱ्या दिवशी हजेरी लावून लोकांची पुरती दमछाक केली आहे. संगमेश्वर तालुक्यात अचानक कोसळलेल्या पावसाने बाजारपेठ अक्षरशः जलमय झाली. रस्ते, नाले आणि गल्लीबोळ पाण्याने तुडुंब भरले. व्यापाऱ्यांची दुकाने सांभाळताना धावपळ उडाली, तर नागरिकांची पावसापासून बचावासाठी पळापळ सुरू झाली. ऐन उन्हाळ्यात पडणाऱ्या या पावसाने वातावरणात गारवा आणला असला तरी अवकाळीच्या या खेळामुळे जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे. शेतकरी वर्गातही संभ्रमाचे वातावरण आहे. कारण एका बाजूला पावसाची गरज असली तरी गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती वाढली आहे. महाराष्ट्राच्या आकाशात सध्या ढगांचा रंगमंच सजला असून पुढील काही दिवस निसर्गाचा हा अनपेक्षित तमाशा अधिकच रंगणार, हे मात्र नक्की!
