महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ मे २०२६ ।। मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी पुन्हा एकदा वाहनांच्या चाकांपेक्षा संयमाचीच अधिक परीक्षा पाहायला मिळाली. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या अपूर्ण रस्ते कामांमुळे तब्बल दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आणि हजारो प्रवासी अक्षरशः महामार्गावर अडकून पडले. रायगडमधील इंदापूर, माणगाव, कोलाड परिसर तसेच रत्नागिरीतील संगमेश्वर, सावर्डे ते बावनदी या टप्प्यांमध्ये रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने प्रवास कासवगतीने सुरू होता. उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम, कोकणाकडे निघालेली चाकरमान्यांची गर्दी आणि त्यात महामार्गाचे रखडलेले काम — या तिहेरी फटक्याने प्रवाशांचा अक्षरशः जीव मेटाकुटीला आला. कुणी कारमध्ये अडकले, कुणी एसटीत घामाघूम झाले, तर अनेक दुचाकीस्वार धुळीच्या ढगात रस्ता शोधताना दिसले. “महामार्ग” या शब्दातील “मार्ग” हरवून फक्त “महाकोंडी” उरली आहे, अशी उपरोधिक प्रतिक्रिया अनेक प्रवाशांनी व्यक्त केली.
गेल्या नऊ दिवसांपासून खाब-कोलाड ते इंदापूर दरम्यान वाहतूक कोंडीचे चित्र कायम असून, रविवारी त्याने विक्राळ रूप धारण केले. एसटी बस, खासगी चारचाकी, रिक्षा, दुचाकी आणि मालवाहू वाहनांची एवढी गर्दी झाली की, वाहनांचे हॉर्न आणि प्रवाशांचा संताप यांचाच आवाज अधिक ऐकू येत होता. महामार्गाचे काम तब्बल ११ वर्षांपासून सुरू आहे; पण पूर्णत्वाचा किनारा अजूनही दिसत नाही. प्रत्येक वर्षी गणेशोत्सव, शिमगोत्सव किंवा उन्हाळी सुट्टी आली की, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना याच त्रासातून जावे लागते. स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि ठेकेदारांच्या संथ गतीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “रस्ता होतोय की केवळ आश्वासनांचा फलक उभा आहे?” असा संतप्त सवाल आता सामान्य माणूस विचारू लागला आहे. विकासाच्या घोषणा मोठ्या आवाजात केल्या जातात; पण रस्त्यावर मात्र वाहनचालकांचीच दमछाक होताना दिसते.
दरम्यान, ठाण्यातील घोडबंदर मार्गावरही रविवारी वाहतूक कोंडीने नागरिकांचा संताप उफाळून आला. मेट्रो प्रकल्पाच्या गर्डर उभारणीचे काम नियोजित वेळेत पूर्ण न झाल्याने भाईंदरपाडा, कासारवडवली, वाघबीळ, पातलीपाडा आणि ब्रह्मांड परिसरातील रस्त्यांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. अंतर्गत रस्त्यांवरही वाहनांचा पूर ओसंडून वाहत होता. प्रवासासाठी निघालेल्या नागरिकांना मिनिटांचा प्रवास तासाभरात पूर्ण करावा लागला. विकासकामे आवश्यक आहेतच; पण ती करताना नागरिकांचे हाल होणार नाहीत, याची जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. कारण महाराष्ट्रात रस्त्यांवर आता फक्त खड्डेच नाहीत, तर रखडलेल्या कामांचे राजकारणही दिसू लागले आहे. महामार्गावरचा प्रवास आता अंतराचा नसून सहनशक्तीचा बनला आहे.
