महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ मे २०२६ ।।राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आज अक्षरशः रडत आहे; पण त्याच्या डोळ्यातले अश्रू बाजारात कुणालाच दिसत नाहीत. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याला कुठे ५० पैसे, कुठे एक रुपया, तर कुठे दोन रुपये किलो असा अपमानास्पद दर मिळत असताना शहरातील ग्राहक मात्र त्याच कांद्याकरिता २० ते २५ रुपये किलो मोजत आहेत. शेतकऱ्याने घाम गाळून पिकवलेला कांदा बाजारात पोहोचेपर्यंत इतका महाग होतो की, मध्ये नेमकं सोनं कोण कमावतं आणि माती कोण खातं, हा प्रश्न पुन्हा उभा राहिला आहे. नाशिकच्या सटाणा बाजार समितीत शेतकरी जितेंद्र साळुंखे यांच्या कांद्याला अवघे ५० पैसे किलो दर मिळाला. आंदोलन केल्यानंतर व्यापाऱ्याने “मोठी कृपा” दाखवत दीड रुपया दर दिला. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी प्रकाश गलधर यांनी १,२०० किलो कांदा विकला; पण हमाली, वाहतूक आणि बाजार खर्च वजा जाता त्यांच्या हातात काहीच उरले नाही, उलट खिशातून एक रुपया भरावा लागला. सोलापुरातील अंकुश गुंजाळ यांनी ७३ गोण्या कांदा विकून जेव्हा हिशोब केला, तेव्हा त्यांच्या हातात आले फक्त ४०० रुपये! एवढ्या पैशात शहरात एखाद्या कुटुंबाचा आठवड्याचा भाजीपाला देखील येत नाही.
कांद्याच्या या दुर्दशेमागे केवळ बाजारपेठ नाही, तर निसर्ग, निर्यात आणि व्यवस्थेचे तिढेही कारणीभूत ठरत आहेत. राज्यात सध्या कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे; पण तुलनेत मागणी कमी आहे. अवेळी पावसामुळे अनेक ठिकाणी कांद्याची प्रतवारी खराब झाली असून, व्यापाऱ्यांना माल वेगळा काढताना १० ते १५ टक्के कांदा बाजूला फेकावा लागत आहे. तापमान वाढल्याने साठवलेला कांदा कुजण्याचे प्रमाणही वाढले आहे. मध्य प्रदेशातील कांदा उत्पादकांनाही याच संकटाचा फटका बसला आहे. परदेशातून सध्या मागणी नसल्याने निर्यातही मंदावली आहे. “कांदा पाणी सोडत असल्याने परदेशात माल पाठवणे धोक्याचे ठरत आहे. माल खराब झाला, तर पैसे मिळणार नाहीत,” असे कांदा निर्यातदार नितीन जैन यांनी सांगितले. युद्धकाळामुळे अनेक देशांमध्ये माल पोहोचण्यास विलंब झाला आणि त्याचा थेट फटका निर्यातदारांना बसला. म्हणजे कांद्याचा प्रश्न केवळ शेतकऱ्याचा राहिलेला नाही; तो आता जागतिक बाजारपेठेच्या हालचालींवरही अवलंबून झाला आहे.
दरम्यान, पुढील ८ ते १५ दिवसांत परिस्थितीत काहीसा बदल होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. पावसापासून वाचलेल्या चांगल्या कांद्याला चांगले भाव मिळू शकतात आणि निर्यातीची स्थितीही सुधारू शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे. पण शेतकऱ्याच्या जखमेवर आश्वासनांचा लेप लावून पोट भरत नाही. आज शेतकरी विचारतोय — “ज्या कांद्याने शहरातल्या स्वयंपाकघराला चव दिली, त्याच कांद्याने माझ्या घरात उपासमारी का आणली?” बाजारात ग्राहकाला महाग आणि शेतकऱ्याला कवडीमोल असा हा कांद्याचा खेळ वर्षानुवर्षे सुरू आहे. सरकार बदलतात, घोषणा बदलतात, पण कांद्याच्या गोणीत भरलेले शेतकऱ्याचे दु:ख मात्र तसेच राहते. कांद्याच्या प्रत्येक थरासोबत आता शेतकऱ्याच्या वेदनांचाही थर उलगडू लागला आहे.
