Pune Metro: हिंजवडीकरांची मेट्रो पुन्हा रुळांवरच अडकली; आयटी कर्मचाऱ्यांना ‘तारीख पे तारीख’चा प्रवास

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ मे २०२६ ।। हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या स्वप्नातील मेट्रो पुन्हा एकदा आश्वासनांच्या स्टेशनवर थांबली आहे. १५ जूनपासून हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो धावणार, या चर्चेने गेल्या काही दिवसांत आयटी पार्कमध्ये उत्साह निर्माण झाला होता; पण आता त्या आशेवर पुन्हा पाणी फिरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रकल्पाच्या कामाला पुन्हा ‘ब्रेक’ लागल्याने पहिला टप्पा थेट जुलैपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, तब्बल ९७ टक्क्यांहून अधिक निधी खर्च झाल्यानंतरही प्रत्यक्ष कामाची गती अजून ९४ टक्क्यांवरच अडकली आहे. रोजच्या वाहतूक कोंडीत तासन्तास अडकणाऱ्या लाखो आयटी कर्मचाऱ्यांसाठी ही बातमी म्हणजे आणखी एक मानसिक ट्रॅफिक जॅम ठरत आहे. “मेट्रो आधी येणार की निवृत्ती?” असा उपरोधिक सवाल आता हिंजवडीच्या चहाच्या टपऱ्यांवर ऐकू येऊ लागला आहे.

८,३१३ कोटी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता खर्च आणि विलंबाच्या वर्तुळात अडकताना दिसत आहे. मे अखेरपर्यंत प्रकल्पाचा ९७.४० टक्के निधी खर्च झाल्याचे आकडे सांगत असले, तरी प्रत्यक्ष कामाची प्रगती मात्र ९४.५८ टक्क्यांवर थांबलेली आहे. बंगाल विधानसभा निवडणुकांमुळे मजूर गावी गेल्याचे कारण पुढे केले जात असले, तरी स्थानकांचे सुशोभीकरण, तांत्रिक चाचण्या आणि अंतिम कामे अजूनही रखडलेली आहेत. पहिल्या टप्प्यात माण (मेगापोलिस), क्वाड्रॉन बिझनेस पार्क, इन्फोसिस फेज २, विप्रो टेक्नॉलॉजीज, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाकड चौक, बालेवाडी स्टेडियम आणि रामनगरसह १२ महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. हीच ती ठिकाणे आहेत जिथे दररोज सकाळ-संध्याकाळ वाहनांच्या रांगांमध्ये आयटी कर्मचाऱ्यांचा वेळ, इंधन आणि संयम तिन्ही जळताना दिसतात. त्यामुळे मेट्रो केवळ प्रवासाचे साधन नसून, हिंजवडीकरांसाठी तो रोजच्या त्रासातून मुक्तीचा मार्ग मानला जात होता.

संपूर्ण २३ किलोमीटरची मार्गिका ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जाहीर करण्यात आले होते; मात्र सध्याची परिस्थिती पाहता संपूर्ण मेट्रो सेवा २०२७ पर्यंत लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे “लवकरच सुरू होणार” या वाक्याचा नागरिकांना आता अक्षरशः कंटाळा आला आहे. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी, “पीआयटीसीएमआरएल संस्थेकडून लेखी अहवाल आल्यानंतरच अधिकृत तारीख जाहीर केली जाईल,” असे स्पष्ट केले आहे. पण दरवेळी नवीन तारीख जाहीर होते आणि प्रत्यक्षात रुळांवर शांतताच दिसते, अशी नागरिकांची भावना बनली आहे. पुण्याच्या विकासाच्या कथा मोठ्या रंगविल्या जातात; मात्र प्रत्यक्षात आयटी हबमधील कर्मचारी अजूनही ट्रॅफिकच्या कैदेतच अडकले आहेत. मेट्रोचे खांब उभे राहिले, रुळ घातले गेले, स्टेशन सजले; पण प्रवाशांच्या आशा मात्र अजूनही प्लॅटफॉर्मवरच थांबलेल्या दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *