Maharashtra Heatwave : उकाड्याने महाराष्ट्र भाजला; पाच दिवस धोक्याचे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ मे २०२६ ।। Maharashtra Today Weather Update News मे महिन्याने यंदा अक्षरशः अंगाराचा तवा हातात घेतला आहे आणि त्यावर महाराष्ट्राला ठेवून भाजण्याचा घाट घातला आहे की काय, अशी अवस्था राज्यातील जनतेची झाली आहे. मार्च-एप्रिलच्या उन्हाने आधीच नागरिकांचा घाम काढला होता, पण मे महिन्याने तर “मीच खरी उष्णतेची राणी!” असा जणू डंका पिटला आहे. दुपारच्या वेळी रस्त्यावर पडले की माणूस चालतोय की भाजलेल्या पोळीचा तुकडा फिरतोय, असा प्रश्न पडावा इतका तापमानाचा तडाखा बसत आहे. हवामान खात्याने पुढील पाच दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा दिला असून, राज्यातील अनेक जिल्ह्यांना हीटवेव्हचा अलर्ट देण्यात आला आहे. उष्णतेने आता फक्त अंगच नाही तर माणसाचा संयमही तापायला सुरुवात केली आहे. “एसी” आणि “कूलर” यांचे दुकान म्हणजे मंदिर, तर थंड पाण्याची बाटली म्हणजे प्रसाद, अशी परिस्थिती शहरोगावी पाहायला मिळत आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा हे भाग सध्या सूर्यदेवाच्या विशेष कृपादृष्टीखाली आलेले दिसत आहेत. नंदूरबारमध्ये उद्याही उष्णतेची लाट कायम राहणार असून, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी या जिल्ह्यांत सलग तीन दिवस तापमान नागरिकांची परीक्षा घेणार आहे. अमरावती आणि अकोला येथे तर पुढील चार दिवस उकाडा हटण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, बीड आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांनाही उष्णतेचा फटका बसणार असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी येथे दमट हवामानामुळे घामाच्या धारा सुरूच राहणार आहेत. समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागांत उन्हापेक्षा घामच अधिक वैतागवाणा ठरत आहे. नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, अन्यथा रस्त्यावर चालताना “माणूस” कमी आणि “वाफाळता मोदक” जास्त दिसेल, अशी उपरोधिक स्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, वर्धा, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांसाठी विशेष उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. डॉक्टरांनी नागरिकांना भरपूर पाणी पिण्याचा, डोक्यावर कापड ठेवण्याचा आणि शक्यतो दुपारच्या उन्हात बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. पण आपल्या लोकांचीही कमाल आहे! सकाळी “आज बाहेर पडायचं नाही” अशी शपथ घेणारे दुपारीच भाजी आणायला किंवा चौकात राजकारण रंगवायला बाहेर पडतात. उष्णतेने आता फक्त तापमान वाढवलेले नाही, तर राजकीय चर्चांपासून घरगुती भांडणांपर्यंत सर्वत्र चिडचिड वाढवली आहे. राज्यातील जनतेने पुढील काही दिवस सावध राहणे अत्यावश्यक असून, हवामान खात्याचे इशारे गांभीर्याने घेणे हीच खरी शहाणपणाची गोष्ट ठरणार आहे. महाराष्ट्र सध्या सूर्याच्या प्रखर नजरेखाली उभा आहे आणि या उष्णतेच्या रणांगणात टिकून राहण्यासाठी संयम, काळजी आणि पाण्याची बाटली हेच खरे अस्त्र ठरणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *