Pandharpur Vitthal Darshan: ऐन वारीतही सहा तासांत विठुरायाचं दर्शन शक्य!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ मे २०२६ ।। पंढरपूर म्हणजे महाराष्ट्राच्या भक्तीचा धडधडता नाडीबिंदू! लाखो वारकरी डोक्यावर तुळस, ओठांवर “विठ्ठल विठ्ठल” आणि मनात अपार श्रद्धा घेऊन दरवर्षी पंढरीची वाट धरतात. पण या भक्तीच्या महासागरात एक वेदनादायक वास्तव कायम उभं राहिलं होतं — दर्शनासाठीची जीवघेणी गर्दी! एखाद्या वारकऱ्याला विठुरायाचं दर्शन घ्यायला बारा-बारा, पंधरा-पंधरा तास रांगेत उभं राहावं लागायचं. आता मात्र या यातनांना पूर्णविराम देण्याची तयारी शासनाने सुरू केली आहे. तब्बल तीन हजार ९९३ कोटींच्या महत्त्वाकांक्षी पंढरपूर कॉरिडॉर योजनेला हिरवा कंदील मिळाला असून, ऐन आषाढी-कार्तिकी वारीतही केवळ सहा तासांत श्री विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घडवण्याचा दावा प्रशासनाने केला आहे. “वारी म्हणजे भक्तीचा उत्सव, शिक्षा नव्हे!” हेच जणू शासनाने आता लक्षात घेतल्याचं चित्र दिसत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रकल्पाच्या इतिवृत्ताला मंजुरी मिळाली. आता पुढील आठवड्यात शासन निर्णय निघणार असून, निधीचा तीस टक्के हिस्सा तातडीने उपलब्ध होणार आहे. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील पन्नास वर्षांतील वाढती वारकरी संख्या लक्षात घेऊन हे नियोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, केवळ काँक्रीटचा पसारा न उभा करता पंढरीच्या अध्यात्मिक आत्म्याचं जतन करण्याचाही दावा करण्यात येतो आहे. जुनं मंदिर, ऐतिहासिक वास्तू, नगरपरिषदेच्या जुन्या इमारती, लोकमान्य विद्यालय यांचं संवर्धन केलं जाणार आहे. कॉरिडॉरमध्ये व्यापाऱ्यांसाठी नवे गाळे, संतपीठ, वैद्यकीय केंद्र, सुरक्षा व्यवस्था, प्रशासकीय कार्यालयं अशी आधुनिक सुविधांची रेलचेल असणार आहे. म्हणजे भक्तीला आता व्यवस्थापनाची जोड मिळणार आहे. मात्र, या सगळ्या विकासाच्या गजरात स्थानिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. “विठुरायाच्या नावाखाली कुणाचं संसाराचं विठ्ठल होऊ नये,” हीच बाधितांची अपेक्षा आहे.

या कॉरिडॉरचा थाटही काही औरच असणार आहे. पंढरपूरला जोडणारे बावीस नवे मार्ग विकसित होणार, दोन किलोमीटरहून अधिक लांबीचा नगर प्रदक्षिणा मार्ग उभारला जाणार, तर वयोवृद्ध वारकऱ्यांसाठी नदीकाठी विशेष स्नानकुंड तयार होणार आहेत. कराड नाका परिसरात नव्या पालखी तळासह अत्याधुनिक हेलिपॅड उभारलं जाणार असून, एकाच वेळी तीन हेलिकॉप्टर उतरू शकतील अशी व्यवस्था असेल. म्हणजे विठुरायाच्या दर्शनासाठी आता भक्तांसोबत व्हीआयपींचीही ‘आकाशमार्गे वारी’ रंगणार! वाहनतळ, स्वागत कमानी, यमाई तलावाचं सुशोभीकरण आणि नवीन दगडी पूल अशा कामांनी पंढरीचा चेहरामोहराच बदलणार आहे. पण पंढरपूरची खरी ओळख ही विठ्ठलाच्या चरणी डोकं टेकवणाऱ्या साध्या वारकऱ्यात आहे. त्यामुळे हा कॉरिडॉर भक्ती सुलभ करणार की पंढरीला फक्त ‘प्रोजेक्ट’ बनवणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *