NCP National Executive List: राष्ट्रवादीची तिजोरी थेट पवारांच्या हाती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ मे २०२६ ।। NCP National Executive List: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या राजकारणापेक्षा ‘घरकारण’ अधिक जोरात सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. पक्षाची धुरा, निर्णयप्रक्रिया आणि आता थेट आर्थिक व्यवहारही पवार कुटुंबाच्या हातात केंद्रित झाल्याचं चित्र समोर आलं आहे. निवडणूक आयोगाला २९ एप्रिल रोजी सादर करण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. कारण या यादीत पक्षाच्या आर्थिक तिजोरीची चावी थेट सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्या हाती देण्यात आल्याचं स्पष्ट दिसतंय. म्हणजे पक्षाचा कारभार आता “राष्ट्रवादी काँग्रेस”पेक्षा “पवार अँड फॅमिली लिमिटेड”च्या धर्तीवर चालतोय का, असा उपरोधिक सवाल राजकीय गल्लीबोळात विचारला जाऊ लागला आहे. विशेष म्हणजे, यादीत तांत्रिक चूक असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं; पण दोन दिवस उलटूनही सुधारित यादी न आल्याने चर्चांना आणखी खतपाणी मिळालं आहे.

या नव्या यादीत पार्थ पवार यांना राष्ट्रीय महासचिवपद देण्यात आलं असून, पक्ष समन्वयाची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर जय पवार यांच्याकडे राष्ट्रीय सचिवपदासोबतच शिस्तपालन समितीचं अध्यक्षपद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खजिनदाराची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाच्या पैशांचा हिशेब, जमा-खर्च, बँक व्यवहार यांसारख्या संवेदनशील सूत्रांवर आता थेट पवार घराण्याचं नियंत्रण असल्याचं या यादीवरून दिसतं. आधी पक्षाच्या आर्थिक व्यवहारांवर अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि वाय. पी. त्रिवेदी यांची संयुक्त पकड होती. आता मात्र प्रफुल्ल पटेल आणि त्रिवेदी यांची नावंच राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीतून गायब झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. म्हणजे पक्षातील जुने विश्वासू नेते आता साइडलाईनला गेले की काय, अशी कुजबूज सुरू झाली आहे. राजकारणात पदं बदलतात, चेहरे बदलतात; पण सत्ता आणि पैशांचा प्रवाह कुठे वळतो, यावरूनच खरी ताकद ओळखली जाते. आणि राष्ट्रवादीत सध्या ती ताकद कुठे केंद्रित आहे, हे या यादीने उघड केलं आहे.

या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत अस्वस्थता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण पक्ष हा विचारांवर चालतो की वारशावर, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात घराणेशाहीचा आरोप नवीन नाही; पण आता तर पक्षाच्या तिजोरीची किल्लीही घरातच राहिल्याचं चित्र दिसू लागलं आहे. कार्यकर्त्यांच्या घामातून उभ्या राहिलेल्या पक्षात आर्थिक व्यवहारांवर काही मोजक्या कुटुंबीयांचं नियंत्रण वाढणं ही बाब विरोधकांसाठी आयती संधी ठरू शकते. दुसरीकडे समर्थक मात्र “विश्वासू हातात जबाबदारी” असं सांगत या निर्णयाचं समर्थन करत आहेत. पण राजकारणात विश्वास आणि वर्चस्व यांच्यातील सीमारेषा फार पातळ असते. राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीच्या यादीने हीच सीमारेषा आता पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आणली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न घुमतोय — राष्ट्रवादी पक्ष चालतोय की पवार परिवाराचं व्यवस्थापन?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *