![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ मे २०२६ ।। मे महिन्याच्या रणरणत्या उन्हाने महाराष्ट्राचा जीव अक्षरशः कासावीस झाला असतानाच हवामान खात्याने आता एकाच वेळी दिलासा आणि धास्ती देणारा इशारा दिला आहे. एका बाजूला विदर्भ आणि मराठवाड्यात सूर्याने जणू अंगारांची उधळण सुरू ठेवली आहे, तर दुसऱ्या बाजूला कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात वादळी पावसाचे ढग जमू लागले आहेत. “उन्हात भाजा आणि पावसात भिजा” अशी अवस्था सध्या राज्याची झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदाचा मान्सून २६ मेपर्यंत केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्याची चाहूल लागली असली, तरी तोपर्यंत महाराष्ट्राला उकाड्याच्या भट्टीतूनच प्रवास करावा लागणार आहे.
कोकणात ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाचा फटका बसणार आहे. अंगातून घामाच्या धारा आणि चेहऱ्यावर चिकटलेली हवा, अशी परिस्थिती नागरिकांना हैराण करत आहे. दुसरीकडे सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूरमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. वाऱ्यांचा वेग, अचानक होणारी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट यामुळे शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे. कारण एका बाजूला उन्हामुळे पिके करपण्याची भीती, तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. हवामानाचे हे लहरी राजकारण पाहून सामान्य माणूसही गोंधळून गेला आहे.
दरम्यान, विदर्भातील उष्णतेने तर कहरच केला आहे. अकोला, जळगाव, वर्धा आणि अमरावती येथे तापमानाने ४५ अंशांचा टप्पा ओलांडला असून नागपूरमध्ये ४४ अंश तापमानाची नोंद झाली. धुळे, परभणी, वाशीम आणि यवतमाळमध्येही सूर्याने अक्षरशः आग ओकली. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत असून नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. उष्णतेची लाट आणि बदलते हवामान यामुळे आरोग्याच्या तक्रारींमध्येही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळणे आणि वादळी पावसाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबणे आवश्यक असल्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. मान्सूनची चाहूल लागली असली, तरी त्याआधी महाराष्ट्राला उष्णतेच्या कठीण परीक्षेतून जावे लागणार, हे मात्र आता स्पष्ट झाले आहे.
