![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ मे २०२६ ।। पेट्रोलने आधीच सामान्य माणसाचा जीव मेटाकुटीला आणला असताना, आता सीएनजीनेही “मी कमी कशात?” असा सवाल करत दरवाढीचा बॉम्ब टाकला आहे. रोजच्या प्रवासासाठी सीएनजीवर विसंबून असलेल्या लाखो नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला आहे. दिल्लीत सीएनजीच्या दरात पुन्हा १ रुपयांची वाढ करण्यात आली असून, आता तेथे प्रति किलो दर ८०.०९ रुपयांवर पोहोचले आहेत. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच २ रुपयांची वाढ झालेली असताना ही नवी वाढ करण्यात आली आहे. म्हणजे सरकार आणि इंधन कंपन्यांनी नागरिकांच्या खिशावर “हप्त्यांमध्ये धक्का” देण्याची नवी पद्धतच सुरू केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. महागाईचा राक्षस इतका बिनधास्त झाला आहे की, तो आता थेट स्वयंपाकघरापासून वाहनांच्या टाकीपर्यंत सर्वत्र धुडगूस घालताना दिसत आहे.
मुंबईत सीएनजीचे दर ८१ रुपये प्रति किलोवर पोहोचले असून, महाराष्ट्रातील इतर शहरांत परिस्थिती आणखी गंभीर आहे. पुण्यात सीएनजी ९१.५० रुपये, नाशिकमध्ये ९३.६५ रुपये, साताऱ्यात तब्बल ९५.५० रुपये तर सोलापूरमध्ये ९३ रुपये प्रति किलो दराने विकले जात आहे. सामान्य माणसाने पेट्रोलच्या महागाईपासून बचाव म्हणून सीएनजीकडे धाव घेतली खरी; पण आता सीएनजीनेही पेट्रोलच्या पावलावर पाऊल ठेवत नागरिकांचा भ्रमनिरास केला आहे. रिक्षाचालक, कॅब चालक आणि छोट्या व्यावसायिकांची अवस्था तर “कमाईपेक्षा इंधन महाग” अशी झाली आहे. दिवसभर धावपळ करून जे काही हातात पडते, त्यातील मोठा हिस्सा आता इंधनाच्या टाकीतच ओतावा लागत असल्याची हतबल भावना चालक वर्गातून व्यक्त होत आहे.
दरम्यान, सीएनजीच्या दरात वाढ झाली असली तरी पीएनजी आणि घरगुती गॅसच्या किंमती मात्र स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. पण त्यामुळे सामान्य माणसाला फारसा दिलासा मिळालेला दिसत नाही. कारण रोजच्या प्रवासाचा खर्च वाढला की, त्याचा परिणाम बाजारातील प्रत्येक वस्तूवर होणार हे उघड आहे. भाजीपासून दूध, मालवाहतूक ते प्रवासी भाडे—सर्वच गोष्टी महाग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावरही नागरिकांनी संताप व्यक्त करत “महागाईचा मीटर आता सरकारपेक्षाही वेगाने धावत आहे,” अशी उपरोधिक टीका सुरू केली आहे. एकीकडे उत्पन्न जागेवरच थांबलेले असताना दुसरीकडे इंधन दरवाढीचा वेग मात्र थेट रॉकेटसारखा वाढत असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
