महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ मे २०२६ ।। जगातील तेलवाहतुकीची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीत आता इराणने थेट ‘टोल नाका’ उभारण्याची तयारी सुरू केली आहे. जहाजे समुद्रातून जातील, पण आता “पैसे भरल्याशिवाय पुढे जाता येणार नाही,” असा इशाराच इराणने जगाला दिला आहे. युद्धातील नुकसानीची भरपाई आणि सुरक्षेच्या नावाखाली इराणने नव्या ट्रॅफिक व्यवस्थेची घोषणा केली असून, या निर्णयामुळे जागतिक व्यापार आणि तेलबाजारात खळबळ उडाली आहे. इराणचे खासदार इब्राहिम अझीझी यांनी जाहीर केले की, सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांसाठी निश्चित मार्ग आखले जातील आणि त्या बदल्यात शुल्क आकारले जाईल. म्हणजे आतापर्यंत समुद्र मोकळा समजणाऱ्या महासत्तांना आता इराणच्या दारात ‘पास’ काढावा लागणार आहे. जगातील जवळपास पाचव्या भागाचे तेल या मार्गाने वाहतूक होते आणि त्यामुळे इराणचा हा निर्णय म्हणजे जागतिक अर्थकारणाच्या नसांवर ठेवलेली बोट मानली जात आहे.
इराणने या नव्या योजनेत फक्त व्यापारी जहाजे आणि सहकार्य करणाऱ्या देशांनाच सवलती देण्याचे संकेत दिले आहेत. म्हणजेच, शत्रू राष्ट्रांची जहाजे किंवा लष्करी उपकरणे घेऊन जाणाऱ्या नौकांवर अतिरिक्त निर्बंध, तपासणी आणि शुल्काचा बोजा पडू शकतो. इराणचे उपराष्ट्रपती मोहम्मद रझा आरिफ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “शत्रू देशांच्या लष्करी हालचाली आम्ही सहन करणार नाही.” या विधानानंतर अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांचे कान टवकारले गेले आहेत. त्यात इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्सने प्रसिद्ध केलेल्या नव्या नकाशात जहाजांसाठी इराणच्या किनाऱ्यालगत ‘सुरक्षित मार्ग’ दाखवण्यात आल्याने या संपूर्ण योजनेमागे फक्त महसूल नव्हे, तर सामरिक दबावाचाही मोठा खेळ असल्याचे स्पष्ट होत आहे. समुद्रात आता केवळ लाटा उसळत नाहीत, तर महासत्तांच्या राजकारणाचे वादळही घोंघावत आहे.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump यांनी इराणला थेट इशारा देत “शांतता करार झाला नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील,” असे सुनावले आहे. दुसरीकडे चीन आणि रशियाने युद्धविरामावर भर देत इराणला पाठिंबा दर्शवण्याची भूमिका घेतली आहे. संयुक्त राष्ट्रांमध्येही बहरीन आणि अमेरिका इराणविरोधी ठराव आणण्याच्या तयारीत असल्याने वातावरण अधिक तापले आहे. जग एका नव्या समुद्री संघर्षाच्या उंबरठ्यावर उभे असल्याची भीती व्यक्त होत आहे. एकेकाळी फक्त तेलवाहतुकीसाठी चर्चेत असलेली होर्मुझ सामुद्रधुनी आता जागतिक राजकारणाच्या पटावरची सर्वात धोकादायक चाल ठरत आहे. समुद्रातील हा ‘टोल प्लॅन’ पुढे व्यापार नियंत्रित करेल की युद्धाची ठिणगी पेटवेल, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
