![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ मे २०२६ ।। पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या रिक्षा ही प्रवासाची सोय कमी आणि प्रवाशांच्या संयमाची परीक्षा जास्त झाली आहे. “मीटरने येणार का?” हा प्रश्न विचारण्याआधीच अनेक रिक्षाचालकांचा चेहरा असा वाकडा होतो, जणू प्रवाशाने भाडं नाही तर थेट रिक्षाच मागितली आहे. आरटीओने मार्च आणि एप्रिलमध्ये तब्बल २ हजार ७९० रिक्षांची तपासणी केली आणि त्यात ९१२ वाहने दोषी आढळली. पाच लाखांचा दंड वसूल झाला, पण शहरातील प्रवाशांच्या मनातला त्रास अजूनही तसाच उभा आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये तीस लाखांची लोकसंख्या, हजारो नोकरदार आणि रोजची धावपळ—या सगळ्यांच्या मध्यभागी रिक्षाचालकांची मनमानी इतकी वाढली आहे की “मीटर” हा शब्द आता फक्त रिक्षेत लटकणाऱ्या शोपीससारखा उरलाय. काही जण पाच आसनी रिक्षेत आठ प्रवासी कोंबतात, तर काही जण मीटरकडे पाहण्याऐवजी थेट चेहऱ्याकडे पाहून भाडं ठरवतात. नियम फक्त पुस्तकात आहेत आणि रस्त्यावर मात्र रिक्षाराज सुरू आहे.
आरटीओने कारवाईचा बडगा उगारला असला, तरी प्रश्न इतकाच आहे की ही कारवाई भीती निर्माण करते की फक्त बातम्यांचा मथळा बनते? कारण शहरातील प्रवाशांचा अनुभव अजूनही तोच आहे. मेट्रो स्थानकाबाहेर उतरलं की रिक्षाचालक जणू शेअर बाजारासारखे दर सांगू लागतात. “मीटरने नाही”, “तिकडे जाणार नाही”, “डबल लागेल”—ही वाक्यं आता शहराच्या दैनंदिन भाषेचा भाग झाली आहेत. प्रशासन सांगतं, तक्रार करा; पण रोज नोकरीला धावणाऱ्या माणसाला पोर्टलवर तक्रार करण्यापेक्षा ऑफिस गाठणं जास्त महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे रिक्षाचालकांची मुजोरी वाढतच जाते. अनेक प्रवाशांनी कॅबकडे वळणं सुरू केलं आहे, कारण तिथं कमीतकमी भाडं ठरलेलं तरी असतं. रिक्षावाले मात्र अजूनही स्वतःला रस्त्याचे बादशाह समजून वागत आहेत. काही चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवतात, काही बेदरकार वेगाने रिक्षा पळवतात आणि मग अपघात झाला की जबाबदारीचा पत्ता लागत नाही.
या सगळ्या प्रकारात सर्वात मोठं नुकसान सामान्य नागरिकांचंच होत आहे. शहर वाढलं, मेट्रो आली, रस्ते रुंद झाले; पण सार्वजनिक वाहतुकीच्या शिस्तीचं चाक अजूनही पंचरच आहे. प्रशासन दरवेळी दंड आकारतं, इशारे देतं; पण रिक्षा संघटनांच्या दबावापुढे कारवाई अनेकदा थंड पडते. प्रवाशांच्या तक्रारींकडे “उद्या पाहू”च्या भावनेने पाहिलं जातं आणि रिक्षाचालकांना आपली मनमानीच नियम वाटू लागते. पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर आज प्रश्न फक्त वाहतुकीचा नाही; तो नागरिकांच्या सन्मानाचा आहे. कारण मीटर बंद पडला की सर्वात आधी विश्वासच कोसळतो.
