इंटरनेटवर इराणचा टोल; भारतात खळबळ : इराणच्या वक्तव्याने खळबळ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० मे २०२६ ।। पूर्वी युद्ध म्हणजे रणगाडे, बॉम्ब आणि सीमांवरचा धुरळा असायचा; पण आता युद्ध थेट आपल्या खिशातील मोबाईलमध्ये शिरलं आहे. सकाळी डोळे उघडल्यावर सर्वप्रथम हातात येणारा स्मार्टफोन अचानक मुका पडला, UPI व्यवहार अडकले, व्हिडिओ कॉल गोठले आणि इंटरनेटचा वेग बैलगाडीपेक्षाही मंदावला तर? ही कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे. पण इराण-अमेरिका संघर्षाच्या धगधगत्या पार्श्वभूमीवर अशी भीती आता केवळ अफवा राहिलेली नाही. इराणच्या लष्करी प्रवक्त्याने “इंटरनेट केबल टोल”चा इशारा दिला आणि जगभरातील तंत्रज्ञान कंपन्यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या. कारण इंटरनेट हे हवेत उडणाऱ्या जादूच्या लहरींवर नाही, तर समुद्राच्या तळाशी पसरलेल्या फायबर ऑप्टिक केबल्सवर धावतं. जगातील तब्बल ९९ टक्के इंटरनेट या केबल्सवर अवलंबून आहे. म्हणजे समुद्राच्या खोल पाण्यातून आता केवळ तेलच नाही, तर आपल्या मोबाईलचा श्वासही वाहत आहे.

‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ हा समुद्रातील अरुंद पट्टा आज जगाच्या अर्थव्यवस्थेचा आणि डिजिटल व्यवस्थेचाही गळा पकडून उभा आहे. या भागातून जाणाऱ्या इंटरनेट केबल्स आशिया, युरोप आणि आफ्रिकेला जोडतात. थोडक्यात सांगायचं तर, जगाच्या इंटरनेटचा “मेन स्विच” जणू या समुद्राखाली लपलेला आहे. इराणने जर या मार्गावर निर्बंध आणले, वापरासाठी शुल्क लावलं किंवा संघर्षामुळे केबल्सचं नुकसान झालं, तर अनेक देशांतील इंटरनेट सेवा कोलमडू शकतात. ही भीती केवळ तांत्रिक नाही; ती आर्थिक आणि सामाजिकही आहे. आज बँका, शेअर बाजार, विमान सेवा, हॉस्पिटल्स, सरकारी यंत्रणा आणि घराघरातील UPI व्यवहार इंटरनेटवर चालतात. इंटरनेटचा वेग मंदावला तर अर्थव्यवस्थेचं चाकच अडखळेल. लोकांना वाटतं, “नेट नाही तर थोडं व्हिडिओ कमी पाहू”; पण वास्तव हे आहे की इंटरनेट बंद म्हणजे आधुनिक जीवनाचा नाडाच दाबला जाणं होय.

भारतासाठी ही परिस्थिती आणखी गंभीर आहे. कारण समुद्राखालून जाणाऱ्या अनेक महत्त्वाच्या केबल्स थेट मुंबई आणि चेन्नई किनाऱ्यावर येऊन पोहोचतात. देशातील मोठ्या टेलिकॉम कंपन्या आणि डेटा नेटवर्क याच मार्गांवर अवलंबून आहेत. म्हणजे होर्मुजमध्ये खळबळ उडाली तर तिचे तरंग थेट भारतीयांच्या मोबाईल स्क्रीनवर उमटणार. आजचा भारतीय नागरिक खिशात पाकीट कमी आणि UPI जास्त बाळगतो. किराणा, पेट्रोल, चहा, रिक्षा — सर्व व्यवहार इंटरनेटच्या बोटावर नाचत आहेत. अशा वेळी इंटरनेट महाग झालं, वेग कमी झाला किंवा सेवा खंडित झाली तर सामान्य माणसाच्या जगण्यालाच फटका बसेल. आणि समुद्राच्या हजारो फूट खोल तळाशी जाऊन केबल दुरुस्त करणं म्हणजे एखाद्या पाणबुडीतून सुई शोधण्यासारखं अवघड काम. म्हणूनच हे केवळ दोन देशांचं राजकारण राहिलेलं नाही; हा आपल्या रोजच्या जगण्याचा प्रश्न बनला आहे. उद्याचा काळ असा येऊ नये की, “नेट चालू आहे का?” हा प्रश्नच देशातील सर्वात मोठा राष्ट्रीय मुद्दा ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *