राज्यभरात इंधन टंचाई ! डिझेलअभावी शेतांची चाके थांबली !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० मे २०२६ ।। राज्यात पेट्रोल-डिझेलचा प्रश्न इतका गंभीर बनला आहे की, आता पेट्रोलपंपावर गाडीपेक्षा रांगच जास्त दिसू लागली आहे. “नो डिझेल, नो पेट्रोल”चे फलक पाहून वाहनचालकांच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी एखाद्या बँकेबाहेर “कॅश संपली”ची पाटी पाहिल्यासारखे झाले आहेत. ग्रामीण भागात तर परिस्थिती अधिक बिकट आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असताना ट्रॅक्टर मालकांना दिवसाला फक्त १० ते १५ लिटर डिझेल मिळत असल्याने शेतीची मशागत अक्षरशः ठप्प झाली आहे. तीन-चार तास नांगरटी करून उरलेला दिवस ट्रॅक्टर सावलीत उभा राहतो आणि शेतकरी पंपाच्या रांगेत! शेतीचे इंजिनच डिझेलवर चालत असल्याने राज्यातील अनेक भागांत शेतकऱ्यांची चिंता आता ढगांपेक्षाही दाट दिसू लागली आहे.

पूर्वी कॅनमध्ये डिझेल भरून शेतात पोहोचवण्याची सोय होती. त्यामुळे ट्रॅक्टर सुरू राहायचा आणि कामही सुरू राहायचे. पण आता ती सुविधा बंद झाल्याने शेतकऱ्याला स्वतः ट्रॅक्टर घेऊन पंपावर धाव घ्यावी लागत आहे. त्यात रांग, नंबर आणि “स्टॉक संपला”चा धक्का वेगळाच! परिणामी, शेतातील कामापेक्षा पेट्रोलपंपावरचा वेळच अधिक जाऊ लागला आहे. दुसरीकडे, पेट्रोलियम कंपन्यांनी मार्चपासून उधारीची क्रेडिट पॉलिसी बंद करून आगाऊ पैसे घेण्याचा नियम लागू केल्याने अनेक पंपचालकांनी डिझेलची मागणी कमी केली आहे. तेल कंपन्यांनी २०० लिटरपेक्षा जास्त डिझेल विक्रीवर नियंत्रण आणल्याने मोठी वाहने, ट्रॅक्टर आणि मालवाहतूक व्यवसाय अक्षरशः अडचणीत सापडले आहेत. शेतीपासून बाजार समित्यांपर्यंत आणि बांधकामापासून ट्रान्सपोर्टपर्यंत सर्वच चक्रे आता मंदावलेली दिसत आहेत.

गडचिरोली, सांगली, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अकोला, वाशिम, बुलढाणा अशा अनेक जिल्ह्यांत पेट्रोलपंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी लोक प्लास्टिक कॅन आणि ड्रममध्ये डिझेल साठवताना दिसत आहेत. प्रशासन “तुटवडा नाही” असे सांगत असले, तरी पंपावरील वास्तव मात्र वेगळेच चित्र दाखवत आहे. विशेष म्हणजे, ८० दिवसांपासून काही भागांतील नागरिकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. एका काळी पेट्रोलपंपावर फक्त हवा भरायला रांग लागायची; आता इंधनासाठीच लोक पहाटेपासून नंबर लावत आहेत. ही परिस्थिती केवळ इंधनटंचाईची नसून राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या नाड्या आवळणारी ठरत आहे. पावसाळ्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या शेतकऱ्याला जर डिझेलच मिळाले नाही, तर यंदा पिकापेक्षा चिंता जास्त उगवेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *