महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० मे २०२६ ।। पेट्रोलच्या दराने सामान्य माणसाच्या खिशाला इतके चटके दिले आहेत की, आता गाडी सुरू करण्यापूर्वीही लोक मीटरकडे नव्हे तर पाकिटाकडे पाहू लागले आहेत. त्यात जागतिक युद्धसदृश परिस्थितीमुळे इंधनाचे दर आणखी भडकले आणि जगभरातील वाहनचालकांची झोप उडाली. अशा वेळी मोनॅकोस्थित FOWE इको सोल्यूशन्स कंपनीने केलेला दावा म्हणजे जणू तहानलेल्या बाजाराला पाण्याचा घोटच! “पाण्याच्या मदतीने वाहनं कमी इंधनात चालतील” ही बातमी ऐकताच अनेकांना एखाद्या विज्ञानपटाची कथा वाटली असेल; पण कंपनीच्या म्हणण्यानुसार हे तंत्रज्ञान आता प्रत्यक्ष चाचणीच्या टप्प्यावर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, या प्रणालीमुळे इंजिन बदलण्याची मोठी गरज नसल्याचा दावा केला जात असल्याने वाहन उद्योगात याची चर्चा रंगू लागली आहे.
कंपनीने विकसित केलेल्या ‘कॅविटेक फ्यूल इमल्शन’ तंत्रज्ञानात इंधन आणि पाणी विशिष्ट पद्धतीने एकत्र मिसळले जाते. यामध्ये तयार होणारे अतिसूक्ष्म पाण्याचे थेंब इंधन जळताना “मायक्रो एक्सप्लोजन” निर्माण करतात. नाव जरी धडकी भरवणारे असले, तरी परिणाम मात्र इंधन बचतीचा सांगितला जात आहे! या प्रक्रियेमुळे इंधन अधिक कार्यक्षमतेने जळते, धूर कमी बाहेर पडतो आणि इंजिनची कार्यक्षमताही वाढते, असा कंपनीचा दावा आहे. भारतासारख्या देशासाठी ही बाब विशेष महत्त्वाची आहे. कारण आपण वापरत असलेल्या कच्च्या तेलापैकी तब्बल ८८ टक्के तेल आयात करावे लागते. म्हणजे पेट्रोलचा दर वाढला की केवळ वाहनचालकच नव्हे तर संपूर्ण अर्थव्यवस्थाच धापा टाकू लागते. अशा वेळी ६ ते १० टक्के इंधन बचतही सरकारसाठी लाखो कोटींचा दिलासा ठरू शकते.
या तंत्रज्ञानामुळे NOx आणि SOx सारख्या प्रदूषक वायूंचे उत्सर्जन ४० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते, असा दावाही करण्यात आला आहे. शिवाय बॉयलर आणि औद्योगिक भट्ट्यांमध्ये कमी घाण साचत असल्याने देखभाल खर्चही कमी होऊ शकतो. अर्थात, “पाण्यावर गाडी धावणार” हे ऐकताच काही लोक उद्या थेट टाकीत मिनरल वॉटर ओतायला धावतील, अशी भीतीही नाकारता येत नाही! कारण हे तंत्रज्ञान अजून प्रयोग आणि चाचण्यांच्या टप्प्यात आहे. सध्या जहाजे, वीज प्रकल्प आणि औद्योगिक यंत्रणांमध्ये त्याची चाचणी सुरू असून, सामान्य वाहनांमध्ये त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर झालेला नाही. तरीही, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि पर्यावरणाच्या संकटात ही संकल्पना भविष्यातील मोठी क्रांती ठरू शकते. कदाचित उद्याच्या काळात पेट्रोलपंपाशेजारी “शुद्ध पाणी उपलब्ध आहे” अशी पाटीही दिसू लागली, तर आश्चर्य वाटायला नको!
