महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ मे २०२६ ।। नवी दिल्ली: आफ्रिकेतील जीवघेण्या इबोला विषाणूने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली असून त्याचा थेट परिणाम आता भारताच्या राजनैतिक कार्यक्रमांवरही दिसू लागला आहे. नवी दिल्लीत पुढील आठवड्यात होणारी बहुचर्चित ‘भारत-आफ्रिका मंच शिखर परिषद’ अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. आफ्रिकेतील वाढत्या इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि आफ्रिकन युनियनने संयुक्तपणे हा निर्णय घेतल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. २८ ते ३१ मे दरम्यान होणाऱ्या या परिषदेत आफ्रिकेतील अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख, मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार होते. व्यापार, डिजिटल तंत्रज्ञान, गुंतवणूक, विकास आणि जागतिक सहकार्य यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार होती; पण आता इबोलाच्या सावटाने या आंतरराष्ट्रीय मेळाव्यावरच ब्रेक लावला आहे. “आरोग्य सुरक्षेपुढे राजनैतिक कार्यक्रमही दुय्यम,” असा संदेश या निर्णयातून स्पष्टपणे दिसत आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत निवेदनात “आफ्रिकेतील बदलती आरोग्य परिस्थिती” हे कारण पुढे केले असले तरी प्रत्यक्षात इबोलाचा वाढता फैलाव हीच या निर्णयामागची मोठी धास्ती मानली जात आहे. आफ्रिकेतील अनेक भागांत इबोला संसर्गाची नवी प्रकरणे समोर येत असून विशेषतः ‘डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो’च्या साउथ किवू प्रांतात परिस्थिती चिंताजनक बनली आहे. येथे आढळलेला इबोलाचा नवीन आणि दुर्मिळ स्ट्रेन वैज्ञानिकांसाठीही मोठे आव्हान ठरत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या विषाणूवर अद्याप प्रभावी लस उपलब्ध नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांत तब्बल ६०० संशयित रुग्ण आढळले असून १३९ संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे. या आकडेवारीने आंतरराष्ट्रीय आरोग्य यंत्रणांची चिंता वाढवली आहे. कोरोनानंतर जग अजून पूर्णपणे सावरलेले नसताना आता इबोलाच्या नव्या संकटाने जागतिक पातळीवर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारतासाठी ही परिषद केवळ राजनैतिक कार्यक्रम नव्हती, तर आफ्रिकेसोबतचे आर्थिक आणि धोरणात्मक संबंध मजबूत करण्याची मोठी संधी मानली जात होती. चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर भारत आफ्रिकेत आपला प्रभाव अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे परिषद लांबणीवर पडणे हा केवळ प्रशासकीय निर्णय नसून त्यामागे जागतिक आरोग्य सुरक्षेची गंभीर चिंता दडलेली आहे. आता या परिषदेच्या नव्या तारखा दोन्ही बाजूंच्या संमतीने ठरवल्या जाणार आहेत. मात्र तोपर्यंत इबोलाच्या वाढत्या सावटाने जगभरातील आरोग्य यंत्रणा आणि सरकारांची चिंता वाढवली आहे. कारण इतिहास सांगतो—इबोला हा केवळ विषाणू नसतो; तो भीती, मृत्यू आणि जागतिक अस्थिरतेची धोक्याची घंटा ठरतो.
