Smart Parking System: पार्किंगच्या गोंधळावर स्मार्ट उपाय; कोंडीला आता लगाम!

Spread the love

Loading

पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन ‘पे अॅण्ड पार्क’ पॉलिसी; स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांची घोषणा, सॅटेलाईट देखरेखीसह आधुनिक व्यवस्था

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ मे २०२६ ।। पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर वाहनांची वाढती गर्दी आणि त्यातून निर्माण होणारी जीवघेणी वाहतूक कोंडी पाहता आता महापालिकेने अखेर ‘स्मार्ट पार्किंग’चा डंका पिटला आहे. रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या बेछूट वाहनांच्या रांगांनी नागरिकांचे जगणे हैराण झाले असताना प्रशासनाने नव्या ‘पे अॅण्ड पार्क’ पार्किंग पॉलिसीद्वारे शहराला शिस्त लावण्याचा निर्धार केला आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी याबाबत माहिती देताना, “वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून महापालिका आणि पोलिस प्रशासन यांच्या समन्वयातून अत्याधुनिक पार्किंग धोरण लवकरच लागू केले जाईल,” अशी घोषणा केली. शहरातील पार्किंगचा बोजवारा उडालेल्या परिस्थितीत ही घोषणा नागरिकांसाठी दिलासादायक मानली जात असली तरी, प्रशासनाच्या पूर्वीच्या अपयशामुळे अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत.

महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत या नव्या धोरणाचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. बैठकीला सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनील पवार, आयटीडीपीचे प्रतिनिधी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. सादरीकरणात पार्किंग पॉलिसीची तांत्रिक आणि व्यावहारिक बाजू उलगडण्यात आली. मात्र केवळ कागदोपत्री योजना नको, तर लोकाभिमुख आणि त्रुटीरहित व्यवस्था हवी, अशी स्पष्ट भूमिका अभिषेक बारणे यांनी घेतली. काही महत्त्वाच्या बाबींमध्ये सुधारणा आणि दुरुस्त्यांच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्या बदलांचा समावेश करूनच हे नवे धोरण शहरात लागू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

या नव्या पार्किंग धोरणात आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार आहे. प्रत्येक भागाच्या गरजेनुसार ‘एरिया बेस्ड पार्किंग’ व्यवस्था उभारली जाणार असून नागरिकांसाठी ‘कलर कोडिंग सिस्टीम’ लागू केली जाईल. त्यामुळे वाहनचालकांना पार्किंगची जागा सहज ओळखता येणार आहे. रस्त्यालगत राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना विशेष पार्किंग परमिट देऊन त्यांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर जड वाहनांची पार्किंग पूर्णपणे बंद करून त्यांच्यासाठी शहराबाहेर स्वतंत्र जागा निश्चित केली जाणार आहे. विशेष म्हणजे, पार्किंगच्या जागांची पडताळणी थेट सॅटेलाईटद्वारे केली जाणार असून संपूर्ण यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र ‘पार्किंग मॅनेजमेंट कक्ष’ स्थापन केला जाणार आहे. वाहनचालकांसोबतच पादचारी आणि सायकलस्वारांसाठीही स्वतंत्र सुरक्षित जागा राखीव ठेवण्याची तरतूद या धोरणात करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार पडणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. ऑन-स्ट्रीट आणि ऑफ-स्ट्रीट पार्किंगचे दर ठरवताना सामान्य माणसाच्या खिशाचा विचार केला जाईल, असे अभिषेक बारणे यांनी स्पष्ट केले. मात्र नागरिकांना अजूनही जुन्या पार्किंग पॉलिसीची आठवण ताजी आहे. तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्या काळात लागू करण्यात आलेली ‘पे अॅण्ड पार्क’ योजना वाहनचालकांचा कमी प्रतिसाद, वाहतूक पोलिसांचा असहकार, ठेकेदारांची उदासीनता आणि प्रशासनाच्या धरसोड वृत्तीमुळे अक्षरशः गुंडाळावी लागली होती. त्या अपयशी प्रयोगावर लाखो रुपयांचा खर्च झाला होता. आता मात्र “यावेळी सक्षम आणि परिणामकारक पॉलिसीच लागू केली जाईल,” असा दावा प्रशासन करत असले तरी शहरातील नागरिकांचे लक्ष प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *