![]()
पिंपरी-चिंचवड जलमय; चिखली, देहूरोड, निगडी, कासारवाडी, आळंदी, पिंपरी समाट चौकात वाहतूक ठप्प, नालेसफाईच्या दाव्यांवर संताप
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ मे २०२६ ।। पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नालेसफाईच्या दाव्यांचा फुगा शुक्रवारी पडलेल्या अवघ्या ३२ मिनिटांच्या पावसाने असा फोडला की, शहराचा कारभार नेमका कागदावर चालतो की जमिनीवर, असा प्रश्न संतप्त नागरिक विचारू लागले आहेत. पहिल्याच पावसाने शहरातील रस्ते, चौक, नाले आणि ड्रेनेज व्यवस्था अक्षरशः कोलमडून पडली. अनेक भागांत गटारांचे झाकण उघडून सांडपाणी थेट रस्त्यावर आले, तर काही ठिकाणी रस्ता आणि नाला यातला फरकच पुसला गेला. “पाऊस आला की शहर बुडणारच,” अशी उपरोधिक भावना नागरिक व्यक्त करू लागले असून प्रशासनाच्या तयारीची पोलखोल पहिल्याच सरीने करून दाखवली आहे.
पावसाचा जोर वाढताच शहरातील प्रमुख नाले आणि स्ट्रॉर्म वॉटर ड्रेनेज यंत्रणा पूर्णपणे अपुरी पडल्याचे भीषण चित्र समोर आले. नाल्यांमध्ये साचलेला गाळ, प्लास्टिक, कचरा, झुडपे आणि वेळेत न उचललेला राडारोडा यामुळे पाण्याचा प्रवाह मंदावला. परिणामी, पाणी थेट रस्त्यांवर साचू लागले. चिखली, देहूरोड, निगडी, कासारवाडी, आळंदी आणि पिंपरी समाट चौक परिसरात परिस्थिती अधिक गंभीर होती. अनेक ठिकाणी वाहनांचे इंजिन बंद पडले, तर काही वाहनचालकांना अक्षरशः गुडघाभर पाण्यात वाहनं ढकलत न्यावी लागली. दुचाकीस्वार, पादचारी आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. काही भागांत नाल्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील काही भागांत ड्रेनेजच्या झाकणांमधून मोठ्या प्रमाणात गटारयुक्त पाणी बाहेर पडत होते. त्यातून आलेला कचरा, प्लास्टिक, चिखल आणि सांडपाणी रस्त्यांवर पसरल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी निर्माण झाली. दूषित पाण्यातून चालताना नागरिकांची अक्षरशः किळसवाणी अवस्था झाली. आरोग्य तज्ज्ञांनीही या परिस्थितीकडे गंभीर इशारा दिला असून डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो आणि त्वचारोगांचा धोका वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. तुटलेले कठडे, उघडी गटारे आणि पाण्याखाली गेलेले रस्ते यामुळे शहरातील सुरक्षेचाच प्रश्न ऐरणीवर आला आहे. “महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते तरी पावसात शहर दरवर्षी असेच बुडते,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देताना दिसत आहेत.
महापालिकेने यापूर्वी शहरातील सुमारे ७० टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला होता. मात्र अवघ्या काही मिनिटांच्या पावसातच शहर जलमय झाल्याने त्या दाव्यांची विश्वासार्हता आता संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. “नालेसफाईचे कोट्यवधी रुपये नेमके कुठे गेले?”, “ड्रेनेजची झाकणे उघडून गटाराचे पाणी रस्त्यावर का आले?”, “तुटलेले कठडे आणि अतिक्रमणांकडे दुर्लक्ष का?” असे सवाल आता नागरिक उघडपणे विचारू लागले आहेत. अवकाळी पावसातच ही अवस्था असेल तर आगामी मुसळधार पावसाळ्यात शहराचे काय होणार, याची चिंता पिंपरी-चिंचवडकरांना सतावू लागली आहे. पावसाने शहरातील रस्तेच नव्हे, तर प्रशासनाच्या दाव्यांचेही खरे वास्तव उघडे पाडले आहे.
