VIP Darshan Ban: वारीत यंदाही व्हीआयपींना विठ्ठलदर्शनाचा बंद दरवाजा!

Spread the love

Loading

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा निर्णय; आषाढी वारीसाठी ५४०० एसटी बस, दहा हजार मोबाईल टॉयलेट आणि ६१ कोटींचा आराखडा

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ मे २०२६ ।।आषाढी वारी म्हटली की भक्तीचा महासागर, टाळ-मृदंगाचा गजर आणि विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकऱ्यांची ओढ! पण या भक्तीसागरात दरवर्षी व्हीआयपी संस्कृतीचा शिरकाव होत असल्याने सामान्य वारकऱ्यांच्या मनात नाराजीचा सूर उमटत होता. यंदा मात्र प्रशासनाने पुन्हा एकदा “वारीत सर्व वारकरी समान” हा संदेश देत व्हीआयपी दर्शनाला स्पष्ट नकार दिला आहे. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आषाढी वारी कालावधीत यंदाही व्हीआयपी दर्शन बंद राहील, अशी ठाम घोषणा केली. त्यामुळे लाखो वारकऱ्यांना दिलासा मिळाला असून विठ्ठलाच्या दरबारात आता ‘मोठा-लहान’ असा भेद नसेल, अशी भावना व्यक्त होत आहे.

आषाढी वारी नियोजनाबाबत झालेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी प्रशासनाला कडक सूचना दिल्या. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, तसेच पत्राशेड, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि भाविकांसाठी आवश्यक सर्व सुविधा सक्षमपणे उभ्या कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. पालखी मार्गावर तसेच विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उभारण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबवली जाणार असून संबंधित विभागांनी २३ मेपर्यंत कामांची यादी प्रशासनाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कामांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून आषाढी वारीच्या कामांना सवलत देण्याचा प्रस्ताव राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

वारीतील लाखो भाविकांच्या प्रवासाची जबाबदारी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने राज्यभरातून तब्बल ५४०० बसगाड्यांची व्यवस्था केली आहे. “वारीत भक्त अडकला तर प्रशासनाला माफी नाही,” अशा कडक भूमिकेतून सर्व बसगाड्यांची तांत्रिक तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंढरपूर शहरात तात्पुरते बसस्थानक उभारण्यात येणार असून त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था काटेकोरपणे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागालाही शहरातील हॉटेल्स, किराणा दुकाने आणि अन्नपदार्थ विक्री केंद्रांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. “वारकऱ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना सोडले जाणार नाही,” असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, पाटबंधारे विभागाला भीमा नदीपात्रात आवश्यक पाणी सोडण्याच्या तसेच होड्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यंदाच्या आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सुविधांसाठी जिल्हा परिषदेचा तब्बल ६१ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. दहा हजार मोबाईल टॉयलेट, पालखी मुक्कामासह २२ ठिकाणी जर्मन हँगर मंडप, भक्ती सागर येथे १०८० कायमस्वरूपी स्वच्छतागृहे आणि वाखरी पालखी तळावर दोन हजार मोबाईल टॉयलेटची सुविधा उभारण्यात येणार आहे. लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेला साजेसं आणि शिस्तबद्ध वारी व्यवस्थापन उभं करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असला तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत किती यश येतं, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *