सॅम ऑल्टमन यांचा यू-टर्न; माणूस अजूनही मशीनपेक्षा मोठा
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ मे २०२६ ।। Sam Altman AI Jobs: काही महिन्यांपूर्वी जगभरातील नोकरदारांच्या छातीत धडकी भरवणारा शब्द म्हणजे ‘एआय’! कार्यालयात संगणक सुरू झाला की कर्मचाऱ्यांच्या मनात एकच प्रश्न उभा राहत होता – “उद्या माझी खुर्ची रिकामी होणार का?” ChatGPT, ऑटोमेशन आणि रोबोटिक्सच्या गजरात अनेकांनी तर नोकऱ्यांच्या अंत्ययात्रेची तयारीच सुरू केली होती. पण आता या भीतीचा सर्वात मोठा ढोल स्वतः फोडणारे Sam Altman पुढे आले आहेत. “मी चुकीचा होतो,” असे कबूल करत त्यांनी एआयबाबतच्या चर्चेलाच नवे वळण दिले आहे. कालपर्यंत जगाला एआयची भीती दाखवणारे तंत्रज्ञान सम्राट आज अचानक माणसाच्या बुद्धीची स्तुती करू लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या परिषदेत बोलताना ऑल्टमन यांनी मोठ्या आत्मविश्वासाने केलेले जुने दावे आता हवेत विरल्याचे मान्य केले. एंट्री-लेव्हल व्हाईट कॉलर नोकऱ्या मोठ्या प्रमाणावर संपतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता. पण वास्तवाने त्यांनाच आरसा दाखवला. “नोकऱ्या जातील” या घोषणेमुळे जगभरातील तरुणांच्या झोप उडाल्या होत्या; अनेकांनी करिअर बदलण्याचे निर्णय घेतले; काहींनी तर एआयला भविष्याचा राक्षस मानून भीतीचे वातावरण निर्माण केले. मात्र आज त्याच एआयचे जनक म्हणत आहेत की, माणसाचा मेंदू अजूनही मशीनपेक्षा मोठा आहे. हे ऐकून लाखो कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
एआय सर्वकाही करू शकतो, पण माणसाची संवेदना, कल्पकता आणि निर्णयक्षमता अजूनही त्याच्या आवाक्याबाहेर आहे, हे वास्तव आता मोठ्या टेक कंपन्यांनाही मान्य करावे लागत आहे. ग्राहकाला समजून घेणे, संकटात निर्णय घेणे, भावना ओळखणे आणि नव्या कल्पना जन्माला घालणे – या गोष्टी अजूनही मशीनच्या आवाक्याबाहेरच आहेत. त्यामुळे “रोबोट येतील आणि माणूस बेरोजगार होईल” हा चित्रपट प्रत्यक्षात इतका सोपा नसल्याचे स्पष्ट होत आहे. जगभरातील कंपन्या आता कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यापेक्षा त्यांना एआयसोबत काम करण्यासाठी तयार करण्यावर भर देताना दिसत आहेत.
दरम्यान, Jeff Bezos यांनीही याच सुरात बोलत एआयमुळे नोकऱ्या पूर्णपणे संपणार नसल्याचे मत मांडले आहे. तंत्रज्ञान बदलते, साधने बदलतात; पण माणसाची गरज संपत नाही, हेच या नव्या चर्चेतून स्पष्ट होत आहे. कालपर्यंत एआयला “नोकऱ्यांचा यमराज” म्हणून रंगवणारेच आता “एआय म्हणजे सहाय्यक” म्हणू लागले आहेत. त्यामुळे भीतीच्या सावटाखाली दबलेल्या तरुणांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. मात्र एक गोष्ट स्पष्ट झाली आहे – काळ बदलतोय, काम बदलतंय, आणि जो स्वतःला बदलायला तयार राहील, त्यालाच उद्याचं जग स्वीकारणार आहे.
