Indigo-Air India: उड्डाणांना ब्रेक; विमानप्रवासाचा खिसा होणार रिकामा

Spread the love

Loading

एअर इंडिया-इंडिगोची मोठी कपात; महाग इंधनामुळे सामान्य प्रवाशांवर नवा आर्थिक बॉम्ब

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ मे २०२६ ।। Indigo-Air India: रेल्वेच्या तिकिटासाठी वेटिंग, बसमध्ये गर्दी आणि आता विमानप्रवासही महाग! सामान्य माणसाने नेमकं प्रवास करायचं तरी कसं, असा सवाल निर्माण करणारी मोठी बातमी समोर आली आहे. देशातील दोन दिग्गज विमान कंपन्या — इंडिगो आणि एअर इंडिया — यांनी देशांतर्गत उड्डाणांवर कात्री चालवण्याचा निर्णय घेतला असून, १ जूनपासून पुढील ९० दिवस अनेक मार्गांवरील फ्लाइट्स कमी होणार आहेत. विमान कंपन्यांच्या या निर्णयामुळे “स्वस्त विमानप्रवास” ही संकल्पनाच आता ढगात विरघळण्याची भीती व्यक्त होत आहे. कारण उड्डाणे कमी म्हणजे तिकिटे महाग, आणि तिकिटे महाग म्हणजे मध्यमवर्गीयांच्या खिशाला पुन्हा एकदा झटका!

कंपन्यांच्या मते, एव्हिएशन टर्बाइन फ्युएल अर्थात ATF च्या वाढत्या किमतींनी विमानवाहतूक क्षेत्राचा अक्षरशः जीव घोटायला सुरुवात केली आहे. काही महिन्यांपूर्वी ८० हजार रुपयांच्या आसपास असलेला इंधन दर आता अनेक शहरांत थेट १ लाखांच्या पुढे गेला आहे. त्यात वेगवेगळ्या राज्यांतील व्हॅटचे दर वेगळे. म्हणजे एका राज्यातून उड्डाण केलं तर खर्च वेगळा, दुसऱ्यात उतरलं तर हिशोब वेगळा! विमान कंपन्यांची अवस्था आता अशी झाली आहे की, “प्रवासी कमी आणि खर्च जास्त” या समीकरणात अनेक मार्ग तोट्यात जात आहेत. त्यामुळे एअर इंडिया तब्बल १५ टक्के उड्डाणे कमी करण्याच्या तयारीत आहे, तर इंडिगोही ५ ते ७ टक्के कपात करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

या निर्णयाचा सर्वात मोठा फटका बसणार आहे तो सामान्य प्रवाशांना. उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर प्रवासी संख्या घटली असली, तरी ज्यांना नोकरी, व्यवसाय किंवा वैद्यकीय कारणांसाठी सतत प्रवास करावा लागतो, त्यांच्यासाठी ही मोठी डोकेदुखी ठरणार आहे. आधीच रेल्वे तिकिटे मिळत नाहीत, रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा त्रास आहे आणि आता विमान कंपन्यांनीही हात वर केल्याने मध्यमवर्गीय प्रवासी अक्षरशः कोंडीत सापडला आहे. विशेष म्हणजे, विमान कंपन्या उड्डाणे कमी करत असताना तिकिटांचे दर मात्र ‘डायनॅमिक प्राइसिंग’च्या नावाखाली आकाशाला भिडू लागले आहेत. म्हणजेच सीट कमी आणि मागणी जास्त — परिणामी खिशाला फटका ठरलेलाच!

उड्डाण कपातीची ही प्रक्रिया अचानक सुरू झालेली नाही. मार्च-एप्रिलपासूनच विमान कंपन्या हळूहळू फ्लाइट्स कमी करत असल्याचे आकडे सांगत आहेत. सिरियमच्या अहवालानुसार, यंदा देशातील प्रमुख विमान कंपन्यांनी गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे ६ टक्के कमी उड्डाणे केली आहेत. एअर इंडिया एक्सप्रेसने तर तब्बल १७ टक्क्यांहून अधिक फ्लाइट्स कमी केल्या. पश्चिम आशियातील तणाव, इंधन दरवाढ आणि आर्थिक दबाव यामुळे भारतीय विमानवाहतूक क्षेत्रावर काळे ढग दाटताना दिसत आहेत. आणि म्हणूनच आता “विमानाने जाणं म्हणजे वेळ वाचवणं” एवढंच राहिलेलं नाही; तर “विमानाचं तिकीट परवडणं” हीच खरी श्रीमंती ठरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *