![]()
गडकरींची डेडलाईन संपली; गणेशभक्तांच्या वाट्याला पुन्हा खड्डे, धूळ आणि वाहतूक कोंडीचेच वास्तव
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जून २०२६ ।। मुंबई-गोवा महामार्गाची कथा आता विकासाच्या पुस्तकातील प्रकरण राहिलेली नसून ती जनतेच्या सहनशक्तीची परीक्षा बनली आहे. “३१ मे २०२६ पर्यंत महामार्ग पूर्ण होईल,” अशी घोषणा मोठ्या दिमाखात करण्यात आली होती. भाषणांच्या व्यासपीठावर आश्वासनांचे फुलोरे उधळले गेले, अधिकाऱ्यांनी पाहण्या केल्या, ठेकेदारांनी गती वाढल्याचे दावे केले; पण ३१ मे उगवला आणि मावळलाही. मात्र महामार्ग पूर्णत्वाला पोहोचला नाही. उलट जनतेच्या पदरी पुन्हा एकदा प्रतीक्षा, धूळ, खड्डे आणि अपूर्ण कामांचेच वास्तव आले. घोषणांचा महामार्ग वेगाने धावला, पण प्रत्यक्ष रस्ता मात्र अजूनही कासवगतीनेच सरकत असल्याचे चित्र आहे.
चिपळूण, संगमेश्वर, निवळी, पाली आणि लांजा या ठिकाणचे पूल आजही अपूर्ण अवस्थेत उभे आहेत. काही ठिकाणी लोखंडी सळ्या बाहेर दिसतात, तर काही ठिकाणी अर्धवट बांधकामामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. संगमेश्वर परिसरात रस्त्यांची कामे रखडलेली आहेत, तर बेरळ परिसरात विकासाची गाडी अजूनही पहिल्या गियरमध्येच अडकलेली दिसते. पावसाळ्याची चाहूल लागली असताना या अपूर्ण कामांमुळे वाहतूक कोंडी, चिखल आणि अपघातांची भीती अधिकच वाढली आहे. प्रशासनाच्या फाईलमध्ये कामे पूर्ण झाल्याचे आकडे असतीलही, पण प्रत्यक्ष रस्त्यावर मात्र नागरिकांना त्याचे दर्शन होत नाही.
दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव जवळ येत आहे. कोकणातील लाखो चाकरमानी मुंबईहून आपल्या गावी जाण्याची तयारी करतील. पण त्यांच्या स्वागतासाठी सुबक महामार्ग नव्हे, तर खड्डे, वाहतूक कोंडी आणि संथ प्रवास उभा राहणार की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. बहादूर शेख नाका ते पागनाका या पट्ट्यातील सततची कोंडी, उंच गटारे आणि खालचे रस्ते, उड्डाणपुलांवर साचणारे पावसाचे पाणी आणि अपघातप्रवण ठिकाणांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे महामार्गावरील प्रवास हा विकासाचा अनुभव नसून संघर्षाचा प्रवास बनत चालला आहे. जनतेच्या संयमाची मर्यादा संपत असताना आश्वासनांची मुदत मात्र वारंवार वाढत असल्याचे चित्र दिसते.
महामार्ग विभागाकडून आता “महिनाभरात कामे पूर्ण होतील” अशी नवी आशा व्यक्त केली जात आहे. परंतु ही आशा जनतेने यापूर्वीही अनेकदा ऐकली आहे. प्रश्न केवळ एका रस्त्याचा नाही; प्रश्न प्रशासनाच्या विश्वासार्हतेचा आहे. तीन-तीन वेळा मुदतवाढ मिळूनही कामे अपूर्ण राहतात, ठेकेदारांवर कारवाई होत नाही आणि नागरिक मात्र त्रास सहन करतात, हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे. विकासाच्या घोषणा मोठ्या असल्या तरी त्यांचा प्रवास प्रत्यक्षात रस्त्यावर उतरला पाहिजे. अन्यथा मुंबई-गोवा महामार्ग हा विकासाचा मार्ग न राहता आश्वासनांच्या खड्ड्यांनी भरलेला राजकीय आरसा ठरत राहील.
