![]()
पीएमपीच्या ताफ्यात १५०० नव्या बस; गर्दी, विलंब आणि सुरक्षेच्या प्रश्नांवर मोठा डोस
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ जून २०२६ ।।पुणेकरांसाठी बसची वाट पाहणे हा अनेकदा नशिबाचा खेळ ठरत आला आहे. थांब्यावर उभा असलेला प्रवासी आणि बसचा अंदाज यांच्यातील नाते हे हवामान खात्याच्या अंदाजापेक्षाही अनिश्चित झाले होते. मात्र आता या परिस्थितीत मोठा बदल घडवण्याची तयारी पीएमपी प्रशासनाने सुरू केली आहे. वर्षअखेरीस तब्बल १५०० नवीन बस पुण्याच्या रस्त्यांवर धावणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये पीएमपीच्या मालकीच्या १००० आणि जीसीसी तत्त्वावरील ५०० बसांचा समावेश आहे. त्याचबरोबर २०२७ पर्यंत केंद्र सरकारच्या पीएम ई-ड्राईव्ह योजनेतून आणखी १००० ई-बस ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे बसच्या कमतरतेने त्रस्त असलेल्या पुणेकरांना अखेर दिलास्याची किरण दिसू लागली आहे.
बीएमसीसी रोडवरील आयएमडीआर महाविद्यालयात आयोजित चर्चासत्रात पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी ही माहिती दिली. “शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना बससेवा मात्र त्याच वेगाने वाढली नाही,” अशी अप्रत्यक्ष कबुली देतानाच त्यांनी सध्या ९५ टक्के बस नियोजित वेळापत्रकानुसार धावत असल्याचा दावा केला. दर एक लाख लोकसंख्येमागे ६० बस असणे आवश्यक असताना पुण्यात हे प्रमाण केवळ २० बसांवर असल्याचे वास्तव त्यांनी मांडले. त्यामुळे नवीन बस आल्यानंतर प्रवाशांना उभ्याने प्रवास करण्याची वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि ८० ते ८५ टक्के प्रवाशांना बसण्याची सुविधा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीचा आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे सुरक्षितता. दरवर्षी पीएमपीच्या बसांशी संबंधित सरासरी दहा जीवघेणे अपघात घडतात. अपघात झाला की दोष फक्त चालकावर ढकलण्याची जुनी सवय आता बदलण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रत्येक बसमध्ये डॅश कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच महिला सुरक्षेच्या दृष्टीने सर्व बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांसाठी हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने वाहतूक व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि जबाबदार करण्याचा प्रयत्न प्रशासन करत असल्याचे यावरून स्पष्ट होते.
बस वाढवण्याबरोबरच बसथांब्यांचेही रूप पालटण्याची तयारी सुरू आहे. शहरातील तब्बल ९ हजार बसथांब्यांपैकी ७५०० ठिकाणी अद्याप साधे छप्परही नाही. पावसात भिजत आणि उन्हात भाजत बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांची अवस्था प्रशासनाच्या दुर्लक्षाची साक्ष देत होती. आता हे थांबे पीपीपी तत्त्वावर विकसित केले जाणार असून इलेक्ट्रॉनिक माहिती फलक, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. बसांची संख्या वाढवणे, सुरक्षा मजबूत करणे आणि थांबे आधुनिक बनवणे या तिन्ही आघाड्यांवर पीएमपीने दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरली, तर पुण्याची सार्वजनिक वाहतूक केवळ सुधारेलच नाही तर शहराच्या वाढत्या वाहतूक कोंडीवरही प्रभावी उपाय ठरू शकते.
