मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर दुपारी वाहतूक बंद; प्रवाशांनी सावध राहा

Spread the love

Loading

बोरघाटातील आडोशी बोगद्याजवळ रॉकफॉल प्रतिबंधक कामे; दोन तास वाहतुकीत मोठे बदल

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ जून २०२६ ।। मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून आज प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. बोरघाटातील आडोशी बोगद्याजवळ रॉकफॉल प्रतिबंधक कामे हाती घेण्यात येणार असल्याने आज, १८ जून रोजी दुपारी १२ ते २ या दोन तासांच्या कालावधीत बोरघाट मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. आडोशी बोगद्याजवळ डोंगरकड्यावर बसविण्यात आलेल्या संरक्षक जाळीत अडकलेले मोठे दगड सुरक्षितरीत्या हटविण्यासाठी हे काम करण्यात येणार असून वाहनचालकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे.

एमएसआरडीसीकडून यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ४१ व्या किलोमीटर परिसरात ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. कामाच्या दरम्यान कोणताही अपघात किंवा जीवितहानी होऊ नये, यासाठी जड आणि अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे या वेळेत प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी आपल्या प्रवासाचे नियोजन आधीच करून पर्यायी मार्गांचा विचार करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कोणतीही अडचण निर्माण झाल्यास द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष योजना आखण्यात आली आहे. मुंबईकडे जाणारी हलकी वाहने, बसेस आणि प्रवासी वाहने यांना लोणावळा-खंडाळा परिसरातून वळवून कनेक्टिंग लिंक मार्गाने पुढे सोडण्यात येईल. तर पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक ५९ व्या किलोमीटरपासून कनेक्टिंग लिंकद्वारे सुरू राहणार आहे. मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक ३९ व्या किलोमीटरपासून पर्यायी मार्गावर वळविण्यात येईल. मात्र जड आणि अवजड वाहनांसाठी बोरघाट मार्गावरील मुंबई वाहिनीवर ५९ किमीपासून तसेच पुणे वाहिनीवर ३० किमीपासून पुढील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर बोरघाट परिसरात दरड कोसळण्याचा धोका वाढतो. त्यामुळे भविष्यातील संभाव्य अपघात टाळण्यासाठी रॉकफॉल प्रतिबंधक जाळ्यांमध्ये अडकलेले दगड वेळोवेळी हटविणे आवश्यक असते. या कामामुळे काही काळ वाहतुकीची गैरसोय होणार असली तरी भविष्यातील सुरक्षित प्रवासासाठी ते तितकेच महत्त्वाचे असल्याचे एमएसआरडीसीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आज दुपारच्या वेळेत मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर प्रवास करणाऱ्या नागरिकांनी वाहतूक बदलांची माहिती घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *