![]()
नऊ प्लॅटफॉर्म, अत्याधुनिक सुविधा; वारकऱ्यांसह लाखो प्रवाशांना मोठा दिलासा
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ जून २०२६ ।। पुणे रेल्वे स्थानकावरील वाढती गर्दी, अपुरी क्षमता आणि भविष्यातील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पुण्याजवळील आळंदी म्हातोबा येथे अत्याधुनिक ‘मेगा कोचिंग टर्मिनल’ उभारण्यात येणार असून पुढील तीन वर्षांत पुणे रेल्वे विभागाचा संपूर्ण चेहरामोहरा बदलणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणे स्थानकावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असून विशेषतः आळंदीला येणाऱ्या लाखो वारकऱ्यांसह रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे दौऱ्यात या प्रकल्पाची घोषणा करत रेल्वेच्या व्यापक विकास आराखड्याची माहिती दिली.
उरुळी येथे मेगा टर्मिनल उभारण्याचा सुरुवातीचा विचार होता. मात्र जमीन संपादनासाठी तब्बल ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याने तो प्रस्ताव बाजूला ठेवण्यात आला. त्याऐवजी रेल्वेची स्वतःची उपलब्ध जागा असलेल्या आळंदी म्हातोबा येथेच अत्याधुनिक टर्मिनल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या ठिकाणी नऊ प्लॅटफॉर्म, सात पिटलाईन आणि तब्बल १७ स्टेबलिंग लाईन्स उभारल्या जाणार आहेत. रेल्वे गाड्यांची स्वच्छता, देखभाल, दुरुस्ती आणि पार्किंगची सर्व व्यवस्था याच ठिकाणी होणार असल्याने पुणे स्थानकावरील कामाचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. परिणामी अधिक गाड्या चालविणे, वेळेचे नियोजन आणि प्रवाशांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.
याच कार्यक्रमात पुणे-शिर्डी नव्या रेल्वे मार्गाला हिरवा झेंडा दाखविण्यात आला, तसेच हडपसर-दानापूर ‘अमृत भारत एक्स्प्रेस’ सेवेलाही प्रारंभ करण्यात आला. पुणे रेल्वे स्थानकावर सध्या असलेल्या सहा प्लॅटफॉर्मची क्षमता अपुरी पडत असल्याने आणखी सहा प्लॅटफॉर्म उभारून त्यांची संख्या १२ करण्यात येणार आहे. जुन्या ‘रूट रिले इंटरलॉकिंग’ प्रणालीऐवजी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली बसवून संपूर्ण रेल्वे ऑपरेशन डिजिटल केले जाणार आहे. तसेच स्थानकाचे तिसरे प्रवेशद्वार विकसित करून वाहतूक कोंडी कमी करण्याचाही आराखडा तयार करण्यात आला आहे. खडकी, शिवाजीनगर, घोरपडी, हडपसर आणि पुणे या सर्व स्थानकांचा एकत्रित विचार करून हा विकास आराखडा तयार करण्यात आला असल्याचे वैष्णव यांनी स्पष्ट केले.
यापुढे पुणे रेल्वेच्या विकासाचा वेग आणखी वाढणार असल्याचे संकेतही रेल्वेमंत्र्यांनी दिले. पुणे-मुंबई तिसरी आणि चौथी रेल्वेलाईन लवकरच सुरू होणार असून भविष्यात बुलेट ट्रेनमुळे पुणे-मुंबई प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत पूर्ण होईल, असा दावा त्यांनी केला. तसेच पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेनमुळे दोन शहरांतील अंतर केवळ दोन तासांवर येईल. महाराष्ट्रासाठी रेल्वे क्षेत्रात २४ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून राज्यातील १३२ रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण सुरू आहे. त्यापैकी १९ स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे. या सर्व प्रकल्पांमुळे पुणे रेल्वे विभाग आधुनिक, वेगवान आणि भविष्यातील गरजांसाठी सक्षम बनणार असल्याचा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.
