गुणवंतांचा गौरव, आशियाई विजेत्यांचा सत्कार; विद्यार्थ्यांना यशाचा नवा मंत्र

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 ऑनलाईन- पिंपरी-चिंचवड, दि. २० जून : “आजचे गुणवंत, उद्याचे शिल्पकार!” या प्रेरणादायी संदेशाने नगरसेवक प्रमोद प्रभाकर कुटे यांच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांच्या डोळ्यांतील अभिमानाने संपूर्ण सभागृह भारावून गेले होते.

या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते कराटे क्षेत्रात भारताचे नाव आशियाई स्तरावर उज्ज्वल करणाऱ्या पदकविजेत्या खेळाडूंचा सत्कार. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळवणाऱ्या या खेळाडूंनी उपस्थित विद्यार्थ्यांसमोर प्रेरणेचा आदर्श ठेवला. त्यांच्या यशोगाथांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि मोठी स्वप्ने पाहण्याची उमेद निर्माण केली.

कार्यक्रमात प्रा. विवेक वेलणकर यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करत बदलत्या काळातील संधी, योग्य ध्येय निश्चिती आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्त्व विशद केले. त्यांच्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना मोठा लाभ झाला. या प्रेरणादायी उपक्रमासाठी नगरसेवक प्रमोद प्रभाकर कुटे यांचे मार्गदर्शन लाभले, तर कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजन व अंमलबजावणीत योगेशजी भागवत यांचे योगदान विशेष उल्लेखनीय ठरले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व मान्यवर, पालक, शिक्षक, स्वयंसेवक आणि उपस्थित नागरिकांचे आभार मानण्यात आले. यावेळी सर्व गुणवंत विद्यार्थी व आशियाई पदकविजेत्या खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *