![]()
दिवसाआड पाणीपुरवठ्याचा फटका; टँकरचे दर दुप्पट, देखभाल शुल्क वाढीने नागरिक हैराण
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ जून २०२६ ।। पुण्याच्या दक्षिण उपनगरांतील गृहनिर्माण संस्थांमध्ये सध्या नळापेक्षा टँकरच जास्त विश्वासार्ह ठरू लागला आहे. दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या निर्णयाने नागरिकांचे पाण्याचे गणित तर कोलमडलेच, पण आता सोसायट्यांचे अर्थकारणही डळमळीत झाले आहे. ज्या सोसायट्या पूर्वी वर्षभरात टँकरचे तोंडही पाहत नव्हत्या, त्या आज दररोज खासगी टँकरच्या दारात उभ्या आहेत. आश्चर्य म्हणजे पाण्याची टंचाई वाढताच टँकरच्या दरांनीही भरारी घेतली आहे. हजार रुपयांत मिळणारा टँकर आता थेट दोन हजार रुपयांवर पोहोचला आहे. परिणामी, लाखो रुपयांचा अतिरिक्त खर्च सोसायट्यांच्या माथी मारला जात असून अखेरीस त्याचा फटका सर्वसामान्य सभासदांच्या खिशाला बसत आहे. पाणी हा मूलभूत हक्क असताना नागरिकांना त्यासाठी दुहेरी किंमत मोजावी लागत असल्याचे चित्र आता पुण्यात स्पष्टपणे दिसत आहे.
येवलेवाडीतील सन एक्झॉटिका सोसायटीची अवस्था या संकटाचे जिवंत उदाहरण ठरत आहे. ३९१ सभासद असलेल्या या सोसायटीला दररोज तीन टँकर मागवावे लागतात. महिन्याला जवळपास शंभर टँकरची गरज भासत असून मार्च ते जून या अवघ्या चार महिन्यांत साडेसात लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च झाला आहे. सोसायटीचे संपूर्ण आर्थिक नियोजन विस्कळीत झाले असून देखभाल निधीवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. दुसरीकडे, आंबेगावातील फालेनगर येथील व्यंकटेश पुरम सोसायटीही त्याच संकटातून जात आहे. १४२ सभासदांची ही सोसायटी पूर्वी टँकरमुक्त होती. मात्र आता दर दोन दिवसांनी तीन टँकर मागवावे लागत असून केवळ पाण्यासाठी महिन्याला एक लाख रुपयांची अतिरिक्त तरतूद करावी लागत आहे. अशा परिस्थितीत देखभाल शुल्क वाढविण्याशिवाय पर्याय उरत नसल्याने आर्थिक भार थेट नागरिकांवर पडत आहे.
समस्या केवळ महागड्या टँकरपुरती मर्यादित नाही. महापालिकेच्या मोफत टँकर व्यवस्थेवरही नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेक सोसायट्यांना वेळेवर टँकर मिळत नाहीत, तर काही ठिकाणी वशिलेबाजीमुळे टँकर दुसरीकडे वळविले जात असल्याचा आरोप होत आहे. सद्गुरू हाइट्स सोसायटीच्या रहिवाशांनी गेल्या पंधरा दिवसांत महापालिकेचा एकही टँकर मिळाला नसल्याची तक्रार केली आहे. अधिकाऱ्यांकडून ‘संदेश पाठवला आहे’ असे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात टँकर पोहोचत नाही. त्यातच जांभूळवाडी परिसरात अनेक ठिकाणी पाणीगळती सुरू असल्याने एकीकडे नागरिक पाण्यासाठी हजारो रुपये खर्च करत असताना दुसरीकडे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याचे विरोधाभासी चित्र दिसत आहे.
पाणीटंचाई ही केवळ नैसर्गिक समस्या नाही; ती नियोजन, वितरण आणि व्यवस्थापनाचीही परीक्षा असते. दिवसाआड पाणीपुरवठ्याची घोषणा करून प्रशासनाने जबाबदारी संपत नाही. वेळेवर नळाचे पाणी नाही, मोफत टँकर नाही आणि खासगी टँकरचे वाढते दर यामुळे सर्वसामान्य नागरिक अक्षरशः आर्थिक कोंडीत सापडला आहे. घरगुती खर्च, देखभाल शुल्क आणि रोजच्या जगण्याचा ताळमेळ बिघडू लागला आहे. पाणी हा व्यापाराचा विषय नसून जीवनाचा आधार आहे, हे प्रशासनाने लक्षात घेण्याची वेळ आली आहे. अन्यथा पावसाळ्याच्या उंबरठ्यावरही पुणेकरांना प्रत्येक थेंबासाठी पैशांची आणि प्रतीक्षेची किंमत मोजत राहावे लागेल.