टीईटी घोटाळ्यानंतर सरकारवर संतापाचा भडका; “सिस्टीमच सडली का?” असा थेट सवाल, तरुणांच्या भविष्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जून २०२६ ।। राज्यातील स्पर्धा परीक्षांचा प्रवास आता गुणवत्तेचा राहिलेला नाही, तर तो संशय, दलाली आणि पेपरफुटीच्या विळख्यात अडकलेल्या व्यवस्थेचा झाला आहे, अशी संतप्त भावना टीईटी पेपरफुटीच्या घटनेनंतर पुन्हा एकदा व्यक्त होत आहे. भिवंडीत टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याचा प्रकार उघड होताच मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “तुमची सिस्टीम एवढी सडलीये का?” असा थेट सवाल करत त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर बोट ठेवले. परीक्षा पुढे ढकलली जाईल, चौकशी होईल, आरोपी पकडले जातील; पण वर्षानुवर्षे अभ्यास करून स्वप्न उराशी बाळगणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या मानसिक वेदनांचे उत्तर कोण देणार, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पेपरफुटी आता अपवाद नसून परीक्षा व्यवस्थेवर लागलेला कायमस्वरूपी डाग बनल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये अधिक तीव्र होत आहे.
अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावरील आपल्या प्रतिक्रियेत शिक्षण क्षेत्रातील वाढत्या गैरप्रकारांवर सडकून टीका केली. “प्रश्नपत्रिका विकण्याचा धंदाच अधिकृत उद्योग झाला आहे,” असा आरोप करत त्यांनी नीट, एमएचटी-सीईटी, तलाठी भरती, पोलीस भरती, एमपीएससी आणि आता टीईटीपर्यंतच्या घटनांची मालिका मांडली. दहावी-बारावीत कसाबसा उत्तीर्ण होणारे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत शंभर टक्के गुणांसह अव्वल कसे ठरतात, हा कोणता चमत्कार आहे, असा उपरोधिक सवाल त्यांनी केला. शिक्षणाच्या परंपरेचा अभिमान बाळगणाऱ्या महाराष्ट्रात परीक्षाकेंद्रांवर कॉपी रोखण्यासाठी ड्रोन उडवावे लागतात, शेकडो केंद्रे काळ्या यादीत टाकावी लागतात, ही व्यवस्था सुधारली म्हणायची की कोसळली, असा टोला त्यांनी लगावला. प्रत्येक घोटाळ्यानंतर सरकार कठोर कारवाईची भाषा करते; मात्र पुढच्या परीक्षेत पुन्हा तोच प्रकार घडतो, हीच खरी शोकांतिका असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यांनी विद्यार्थ्यांच्या संघर्षालाही ठळकपणे अधोरेखित केले. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण दिवसरात्र अभ्यास करून भविष्य घडविण्याचा प्रयत्न करतो; पण पैशांच्या बळावर प्रश्नपत्रिका विकत घेणाऱ्यांपुढे त्याचे कष्ट निष्प्रभ ठरतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक गैरप्रकार हा केवळ कायद्याचा भंग नसून लाखो तरुणांच्या स्वप्नांवर घाला असल्याचे त्यांनी म्हटले. वारंवार होणाऱ्या घोटाळ्यांमुळे अनेक विद्यार्थी नैराश्यात जात असून काही जण टोकाची पावले उचलत आहेत, ही परिस्थिती कोणत्याही सुसंस्कृत समाजाला शोभणारी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने केवळ घोषणांचा पाऊस पाडण्याऐवजी परीक्षा प्रक्रियेतील भ्रष्ट जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी कठोर आणि तातडीची पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.
टीईटी पेपरफुटीच्या घटनेने पुन्हा एकदा राज्याच्या परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या रॅकेटवर निर्णायक कारवाई झाली नाही, तर संतापाचा उद्रेक अटळ ठरेल, असा इशाराही अमित ठाकरे यांनी दिला. “विद्यार्थ्यांच्या भविष्याचा बाजार मांडणाऱ्या नराधमांना थेट तुरुंगात टाका,” अशी ठाम मागणी करत त्यांनी सरकारला जागे होण्याचे आवाहन केले. कारण परीक्षा ही तरुणांच्या भविष्याची दारे उघडणारी प्रक्रिया असते; तीच जर संशयाच्या दलदलीत अडकली, तर राज्याच्या प्रगतीची सर्व स्वप्ने कागदावरच राहतील. आता विद्यार्थ्यांना आश्वासनांची नव्हे, तर पारदर्शक आणि विश्वासार्ह परीक्षा व्यवस्थेची गरज आहे. सरकारनेही या इशाऱ्याचे गांभीर्य ओळखून कृती केली, तरच शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा उभा राहू शकेल.