![]()
वारकऱ्यांचा मार्ग मोकळा; पंढरीत आता सेवेलाच खरा मान मिळणार
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जून २०२६ ।। आषाढी एकादशी जवळ आली की पंढरपूर म्हणजे भक्ती, भाव आणि लाखो वारकऱ्यांच्या पावलांनी दुमदुमणारे श्रद्धेचे महासागर बनते. पण या महासागरात अनेकदा व्हीआयपी संस्कृतीची बोट घुसते आणि तासन्तास रांगेत उभ्या असलेल्या वारकऱ्यांच्या संयमाची परीक्षा घेतली जाते. यंदा मात्र प्रशासनाने याच संस्कृतीवर थेट हातोडा मारण्याचा निर्णय घेतला आहे. १० जुलैपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद राहणार असून, मंदिर परिसर ‘नो व्हेईकल झोन’ घोषित करण्यात येणार आहे. लाखो वारकऱ्यांना कमी वेळेत आणि सुलभ दर्शन मिळावे, हा या निर्णयामागील मुख्य हेतू असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले आहे. भक्तीच्या दरबारात पद, पैसा आणि प्रतिष्ठेपेक्षा वारकऱ्यांचा हक्क मोठा असल्याचा संदेश या निर्णयातून अधोरेखित झाला आहे.
गेल्या वर्षी व्हीआयपी दर्शन बंद केल्याचा परिणामही सकारात्मक दिसून आला होता. दर्शनासाठी लागणारा वेळ तब्बल पाच ते सहा तासांनी कमी झाला, तर मंदिर परिसरातील गर्दीचे नियोजन अधिक सुटसुटीत झाले. याच अनुभवाच्या आधारावर यंदाही त्याच पद्धतीने व्यवस्था राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर परिसरात वाहनांना प्रवेश बंद असल्याने प्रदक्षिणा मार्ग मोकळा राहील, भाविकांची सुरक्षितता वाढेल आणि आपत्कालीन सेवांनाही काम करणे सोपे जाईल. श्रद्धेचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी प्रशासनाने यावेळी केवळ घोषणा न करता नियोजनालाच प्राधान्य दिले आहे.
वारी म्हणजे केवळ दर्शन नव्हे, तर लाखो भाविकांच्या मूलभूत सुविधांचीही मोठी परीक्षा असते. त्यामुळे पंढरपूर, वाखरी, ६५ एकर परिसर आणि पालखी मार्गावर स्वच्छता, तात्पुरती शौचालये, महिला स्नानगृहे, हिरकणी कक्ष, पुरेसे सफाई कर्मचारी आणि प्रकाशव्यवस्था यावर विशेष भर देण्यात आला आहे. चंद्रभागा नदीपात्रातील धोकादायक खड्डे बुजविणे, उघड्या विहिरींना मजबूत बॅरिकेडिंग करणे आणि आषाढीपूर्वी नदीत पुरेसे पाणी सोडण्याचे नियोजन करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. आरोग्य विभागाची पथके, औषधसाठा, मुख्यमंत्री आरोग्य रथ आणि वारकरी सेवा सुविधा केंद्र चोवीस तास कार्यरत ठेवण्याची तयारीही सुरू झाली आहे. म्हणजे यंदाची वारी केवळ धार्मिक नाही, तर व्यवस्थापनाचा आदर्श ठरवण्याचा प्रयत्न दिसत आहे.
पालखी मार्गावरील प्रत्येक मुक्कामस्थळी दिशादर्शक फलक, स्वच्छता, आरोग्य सेवा, वीजपुरवठा आणि मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर, पुणे आणि सातारा जिल्हा प्रशासनाला समन्वयाने काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाखरी-केबीपी महाविद्यालय मार्गाची दुरुस्ती, वृक्षारोपण आणि प्रकाशयोजनेची कामेही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला सन्मान, सुरक्षितता आणि सुविधा मिळाल्या, तरच आषाढी वारीचे खरे सार्थक होईल. कारण पंढरीची परंपरा ही व्हीआयपी संस्कृतीची नव्हे, तर “ज्ञानोबा-तुकाराम” म्हणत समानतेने चालणाऱ्या वारकऱ्यांची आहे.