महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – नाशिक – २६ सप्टेंबर – नाशिक शहरात करोना बाधितांच्या वाढत्या संख्येला गेल्या आठवड्यापासून काहीसा लगाम बसला असून, बाधितांच्या संख्येचा आलेख कमी होताना दिसत आहे. ही दिलासादायक बाब असून, अॅक्टिव्ह रुग्णसंख्याही पाच हजारांवरून थेट साडेतीन हजारांवर आली आहे. त्यामुळे नाशिक शहरातील करोना बाधितांचारिकव्हरी रेट हा राज्यात सर्वाधिक ९१.०५ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ७५.०९ टक्के असून, त्या मानाने नाशिकचा रिकव्हरी रेट १५ टक्के अधिक आहे. चाचण्यांची संख्या वाढवल्यामुळे आणि वेळीच रुग्णांवर उपचार केल्यामुळे रिकव्हरी रेट वाढल्याचा दावा वैद्यकीय विभागाने केला आहे.
अॅक्टिव्ह रुग्णसंख्याही घटली
नाशिक शहरात सद्य:स्थितीत करोनाबाधितांची संख्या ४६,८४३ पर्यंत पोहोचली आहे. सध्या ३,५३४ अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. शहरातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात साडेसहा हजारांपर्यंत पोहोचली होती. मात्र, ही संख्या नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश आले आहे. सध्या ४२ हजार ६५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, ३,५४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे करोनाची स्थिती नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला काहीसे यश येत असल्याचे चित्र आहे.
चाचण्यांची संख्या वाढविण्यात येऊन जास्तीत जास्त रुग्णांचे ट्रेसिंग केले जात आहे. त्यामुळे नाशिकचा रिकव्हरी रेट हा चांगला आहे. अॅक्टिव्ह रुग्णसंख्याही कमी होत असून बाधितांचेही प्रमाण कमी होत आहे. करोना नियंत्रणासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येत आहे.
– कैलास जाधव, आयुक्त, महापालिका