![]()
पावसाच्या पहिल्या जल्लोषाने सह्याद्री खुलला; पर्यटकांची लगबग, व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा समाधानाचे हास्य
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०४ जुलै २०२६ ।। पावसाळा म्हणजे महाराष्ट्राच्या डोक्यावरचं हिरवं मुकुट, आणि त्या मुकुटातील सर्वात झगमगता हिरा म्हणजे लोणावळ्याचा भुशी डॅम! महिनाभर ढगांनी फक्त आश्वासनांची उधळण केली, पण पाण्याचा थेंब मात्र हात आखडता घेतला. पर्यटन व्यवसायाने अक्षरशः हुंदके दिले, हॉटेलवाल्यांनी रस्त्याकडे डोळे लावले आणि भजी-चहाच्या टपऱ्यांवर शांततेची धूळ साचली. पण अखेर निसर्गानेही आपली कंजुषी सोडली. शुक्रवारी सकाळी भुशी डॅम ओव्हरफ्लो झाला आणि जणू लोणावळ्याच्या नसानसांत पुन्हा प्राण संचारला. धरणाच्या पायऱ्यांवरून खळखळणारे पाणी पाहण्यासाठी पर्यटकांनी गाड्यांचे स्टेअरिंग थेट भुशीकडे वळवले. विकेंडच्या तोंडावर आलेली ही जलधारा म्हणजे पर्यटन व्यवसायासाठी देवाने दिलेला बोनसच ठरला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या दमदार पावसामुळे सह्याद्रीने पुन्हा हिरवा शालू परिधान केला आहे. धुक्याने डोंगरांना कवेत घेतले आहे, तर दऱ्याखोऱ्यांतून असंख्य धबधबे फेसाळत धावत आहेत. भुशी डॅम ओसंडताच टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट, राजमाची, कार्ला-भाजे लेणी, पवना, तुंगार्ली, लोहगड, विसापूर, तिकोना अशा सर्व पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. गतवर्षी जूनच्या मध्यावर ओव्हरफ्लो झालेला भुशी डॅम यंदा उशिरा भरला असला, तरी त्याच्या एका क्षणाने महिनाभराची प्रतीक्षा संपवली. स्थानिक व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, टॅक्सी चालक, फेरीवाले आणि लहान दुकानदार यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आशेची पालवी फुटली आहे. निसर्ग खुलला की लोणावळ्याची अर्थव्यवस्थाही कशी फुलते, याचे हे जिवंत उदाहरण आहे.
मात्र पावसाचा आनंद आणि बेफिकीरी यांच्यातील सीमारेषा ओळखणे तितकेच गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांत भुशी डॅम आणि परिसरात स्टंटबाजी, मद्यधुंद हुल्लडबाजी, धोकादायक सेल्फी आणि नियमभंगामुळे अनेक दुर्दैवी अपघात घडले. काही मोजक्या बेजबाबदार पर्यटकांमुळे संपूर्ण पर्यटनस्थळाची प्रतिमा मलीन झाली. पावसाच्या पाण्याशी स्पर्धा करण्याचा हट्ट अनेकांच्या जीवावर बेतला. म्हणूनच लोणावळा शहराचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील आणि ग्रामीण पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी पर्यटकांना स्पष्ट इशारा दिला आहे—आनंद घ्या, पण जीवाशी खेळू नका. निसर्गाचा उत्सव साजरा करताना शिस्त, संयम आणि सुरक्षितता विसरू नका. कारण सह्याद्री सौंदर्य दाखवतो, पण निष्काळजीपणाला कधीच माफ करत नाही.
यंदाचा मान्सून उशिरा आला, जून महिना कोरडा गेला, शेतकरी आणि पर्यटन व्यवसाय दोघेही आकाशाकडे डोळे लावून बसले होते. पण आता पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. भुशी डॅमच्या पायऱ्यांवरून वाहणारे पाणी हे केवळ पर्यटनाचे आकर्षण नाही; ते सह्याद्रीच्या पुनर्जन्माचे प्रतीक आहे. मात्र या जल्लोषाला जबाबदारीची जोड मिळाली, तरच लोणावळ्याची ओळख निसर्गप्रेमींचे स्वर्ग म्हणून कायम राहील. अन्यथा काहींच्या बेफिकीरीमुळे आनंदाचा हा धबधबा पुन्हा दुःखाच्या पुरात वाहून जाईल.