रेल्वेचा डबा की सुहागरातीचा राजवाडा?

Spread the love

Loading

फुलांचा थाट, मेणबत्त्यांची आरास आणि व्हायरल प्रसिद्धी; पण नियम मोडणाऱ्यांवर रेल्वेचा चाबूक अखेर चाललाच

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० जुलै २०२६ ।। रेल्वेचा फर्स्ट एसी डबा म्हणजे प्रवाशांच्या सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी असलेली जागा. पण काही जणांनी त्यालाच थेट ‘हनीमून सूट’ बनवण्याचा उद्योग केला आणि सोशल मीडियावर त्याचे कौतुकाचे फुगे उडू लागले. फुलांचा सडा, फुग्यांची कमान, गुलाबाच्या पाकळ्या, रोषणाई आणि वर ‘I Love You’ची सजावट पाहून अनेकांनी हा प्रवास प्रेमाचा उत्सव असल्याचे म्हटले. पण रेल्वे हा विवाहसोहळ्याचा मंडप नाही आणि सरकारी मालमत्ता ही वैयक्तिक हौस भागवण्याची जागाही नाही, हे काही जण जाणीवपूर्वक विसरल्याचे या घटनेतून दिसून आले. प्रसिद्धीच्या नादात नियमांना पायदळी तुडवण्याची ही फॅशन आता रेल्वे प्रशासनालाच महागात पडली.

बल्लारशाहहून मुंबईकडे धावणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेसमधील फर्स्ट एसी केबिनमध्ये हा सगळा थाट उभारण्यात आला होता. सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे सजावटीत मेणबत्त्यांचाही वापर करण्यात आला. वातानुकूलित बंदिस्त डब्यात ज्वलनशील वस्तू वापरणे म्हणजे संकटाला निमंत्रण देण्यासारखेच. एका क्षणाच्या निष्काळजीपणामुळे शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो, हे साधे गणितही दुर्लक्षित करण्यात आले. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच रेल्वे प्रशासन जागे झाले आणि ड्युटीवरील टीटीईला तात्काळ निलंबित करण्यात आले. नियमांचे पालन करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर असते, त्यांनीच डोळेझाक केली तर व्यवस्था उभी कशी राहणार, असा प्रश्न आता प्रवासी विचारत आहेत.

रेल्वेचे नियम मात्र अगदी स्पष्ट आहेत. अधिकृत परवानगीशिवाय कोणत्याही डब्याची सजावट करता येत नाही. परवानगीशिवाय फुले, फुगे किंवा इतर साहित्य लावणे, रेल्वेच्या मालमत्तेत बदल करणे अथवा वैध अधिकाराशिवाय अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणे हा नियमभंग ठरतो. त्यातही मेणबत्त्या, दिवे किंवा अन्य ज्वलनशील वस्तू वापरणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. अशा प्रकरणात संबंधित प्रवासी, सजावट करणारे, ड्युटीवरील टीटीई आणि कोच अटेंडंट यांच्यावरही कारवाई होऊ शकते. नियमांचे उल्लंघन केल्यास सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास, एक हजार रुपयांपर्यंत दंड, तर आग लावण्यासारख्या प्रकारात तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि पाच हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.

या घटनेने एक गोष्ट पुन्हा अधोरेखित केली आहे. सोशल मीडियावर काही क्षणांची वाहवा मिळवण्यासाठी सार्वजनिक सुरक्षेशी खेळणे हा शहाणपणाचा नव्हे तर बेफिकीरीचा कळस आहे. रेल्वे हा देशाच्या लाखो प्रवाशांचा जीवनदुवा आहे; तो कोणाच्या हौशी प्रयोगांचा रंगमंच नाही. प्रेम साजरे करायला कुणी मनाई करत नाही, पण त्यासाठी नियमांची राख करून इतरांच्या जीवाशी खेळण्याचा परवाना कोणालाच नाही. रेल्वेने टीटीईवर केलेली कारवाई हा केवळ एका कर्मचाऱ्यावरील निर्णय नसून, नियम मोडणाऱ्यांना दिलेला स्पष्ट इशारा आहे—सरकारी यंत्रणा ही सजावटीच्या फुग्यांवर नाही, तर शिस्तीच्या पायावर उभी असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *