![]()
सोशल मीडियावरील उपरोधिक मोहिमेपासून जंतरमंतरच्या आंदोलनापर्यंतचा प्रवास; तरुणांचा डिजिटल रोष राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ जुलै २०२६ ।। ‘इन्स्टाग्राम’ म्हणजे फक्त रील्स, लाईक्स आणि मनोरंजनाचा बाजार, ही समजूत आता कालबाह्य ठरत असल्याचे चित्र देशासमोर उभे राहिले आहे. सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश न्या. सूर्यकांत यांनी मे २०२६ मध्ये केलेल्या एका टिप्पणीवरून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटली. त्याच प्रतिक्रियेला आंदोलनाचे रूप देत ‘कॉकरोच’ हे प्रतीक स्वीकारण्यात आले आणि १६ मे रोजी अभिजित दीपके यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ची स्थापना केली. दुसऱ्याच दिवशी @cockroachjantaparty हे इन्स्टाग्राम अकाउंट सुरू झाले. सुरुवातीला मीम्स, रील्स आणि उपरोधिक पोस्ट इतपत मर्यादित वाटणारी ही मोहीम बेरोजगारी, नीट-यूजी परीक्षेतील कथित गैरव्यवहार, शिक्षणव्यवस्थेतील विस्कळीतपणा, महागाई आणि तरुणांच्या प्रश्नांवर सातत्याने हल्लाबोल करू लागली. लोकांचे लक्ष वेधण्यासाठी कोणत्याही भपक्याची गरज नसते; मुद्दे धारदार असतील तर मोबाईलची स्क्रीनही जनतेचा चौक बनते, हे या मोहिमेने दाखवून दिले.
अवघ्या काही दिवसांत लाखो तरुण या मोहिमेशी जोडले गेल्याचा दावा पक्षाने केला. सदस्य नोंदणीपासून पोस्टर, जाहीरनामा, ग्राफिक्स आणि प्रचारसाहित्य तयार करण्यासाठी ‘चॅट जीपीटी’सह विविध कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांचा वापर करण्यात आल्याचेही पक्षाने स्पष्ट केले. पारंपरिक पक्षांकडे कोट्यवधींची यंत्रणा असताना, दुसरीकडे काही स्वयंसेवक, इंटरनेट आणि कल्पकता यांच्या जोरावर उभी राहिलेली ही डिजिटल मोहीम राष्ट्रीय चर्चेचा विषय ठरली. सत्तेच्या दालनात बसून जनतेचा नाडीचा अंदाज घेत असल्याचा दावा करणाऱ्यांना सोशल मीडियावरचा हा वाढता असंतोष दिसला नाही, की तो दुर्लक्षित करण्यात आला, हा प्रश्न अधिक ठळकपणे समोर आला.
जून आणि जुलैमध्ये या डिजिटल आंदोलनाने मोबाईलच्या पडद्याबाहेर पाऊल टाकले आणि दिल्लीतील जंतरमंतरवर प्रत्यक्ष धरणे, निदर्शने आणि ‘चलो संसद’ मोर्चाच्या रूपाने ते उभे राहिले. विविध विद्यार्थी संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. सोशल मीडियावरील मोहिम आणि रस्त्यावरचा संघर्ष अशा दोन्ही आघाड्यांवर आंदोलन सुरू राहिले. या सर्व घडामोडींनंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची चर्चा अधिक गडद झाली आणि इन्स्टाग्रामवर सुरू झालेल्या मोहिमेने राष्ट्रीय राजकारणाला स्पर्श केल्याचे चित्र निर्माण झाले. डिजिटल माध्यमावर उमटलेला आवाज केवळ ट्रेंड नसतो; तो रस्त्यावर उतरला की सत्तेलाही त्याची दखल घ्यावी लागते, हे पुन्हा अधोरेखित झाले.
दरम्यान, जुलैमध्ये आंदोलनादरम्यान ‘कॉकरोच जनता पार्टी’चे इन्स्टाग्राम अकाउंट काही काळासाठी उपलब्ध नसल्याने नव्या वादाला तोंड फुटले. अभिजित दीपके यांनी ‘मेटा’ने अकाउंट हटवल्याचा दावा केला; मात्र काही वेळातच ते पुन्हा सुरू झाल्याने चर्चेला आणखी उधाण आले. याच काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावर सलग दोन ‘व्हर्टिकल’ व्हिडिओ प्रसिद्ध केले. ‘मित्रांनो’ऐवजी ‘फ्रेंड्स’ या संबोधनाने सुरू झालेल्या या व्हिडिओंची शैलीही चर्चेचा विषय ठरली. सोशल मीडियावर वाढलेल्या जनसंपर्काच्या स्पर्धेत आता सत्ताधारी आणि आंदोलनकर्ते दोघेही एकाच व्यासपीठावर उभे असल्याचे स्पष्ट झाले आहे. इन्स्टाग्राम केवळ करमणुकीचे साधन राहिले नसून, जनमत घडविणारे, प्रश्नांना राष्ट्रीय पातळीवर नेणारे आणि सत्तेला उत्तर द्यायला भाग पाडणारे प्रभावी माध्यम बनत असल्याचे या संपूर्ण घडामोडींनी अधोरेखित केले.