बांकीपूरच्या पराभवाने भाजपला आत्मपरीक्षणाचा इशारा; अतिआत्मविश्वास, उमेदवार बदल आणि स्थानिक नाराजी ठरली निर्णायक
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ ऑगस्ट २०२६ ।।बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील तीन विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल भाजपसाठी धक्कादायक राजकीय संदेश घेऊन आले आहेत. गुजरातमधील मांजलपूरची जागा राखण्यात भाजपला यश आले असले, तरी बिहारमधील बांकीपूर आणि मध्य प्रदेशातील दतिया या परंपरागत बालेकिल्ल्यांमध्ये पक्षाला पराभव पत्करावा लागला. त्यात बांकीपूरचा धक्का अधिक मोठा आहे. तब्बल ३० वर्षे भाजपच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात प्रशांत किशोर यांनी निर्णायक विजय मिळवला. केंद्र आणि राज्यात सत्ता, मजबूत संघटनात्मक यंत्रणा आणि पारंपरिक मतदार असूनही कमळ कोमेजले. त्यामुळे हा केवळ एका पोटनिवडणुकीचा निकाल मानायचा की भाजपच्या निवडणूक रणनीतीला मिळालेला इशारा, हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
बांकीपूरमध्ये भाजपचा आत्मविश्वास हाच त्याचा सर्वात मोठा कमकुवत दुवा ठरल्याचे निकालातून दिसते. नितीन नवीन यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षाला विजय जवळपास निश्चित असल्याचा विश्वास होता. मात्र उमेदवारीच्या मुद्द्यावर सुरुवातीपासूनच गोंधळ झाला. अभिषेक बंटी यांना उमेदवारी देऊन नंतर ती मागे घेण्यात आली आणि नवीन कुमार यांना मैदानात उतरवण्यात आले. प्रशांत किशोर यांच्या तुलनेत हा चेहरा मतदारांसाठी तितका प्रभावी ठरला नाही. त्यातच भाजपच्या विजयाबाबत अतिआत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याचा संदेश विरोधकांनी मतदारांपर्यंत पोहोचवला. प्रशांत किशोर यांनी मात्र याच मुद्द्याला हत्यार बनवले. भाजपचा अहंकार मोडण्यासाठी मतदान करा, अशी थेट भूमिका घेत त्यांनी प्रचारात आक्रमकता आणली.
दुसरीकडे, प्रशांत किशोर यांनी मागील विधानसभा निवडणुकीतील अपयशातून धडा घेत बांकीपूरमध्ये नियोजनबद्ध मोर्चेबांधणी केली. पदयात्रा, छोट्या सभा, मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठी आणि स्थानिक प्रश्नांवर सातत्याने केलेला संवाद यामुळे त्यांची पकड मजबूत होत गेली. भाजपच्या पारंपरिक मतदारांमध्येही यावेळी उत्साह कमी दिसल्याचे चित्र समोर आले. नितीश कुमार यांच्याशी जोडला गेलेला मतदार काही प्रमाणात तटस्थ राहिला, तर काही मतदारांनी नव्या आणि तुलनेने वेगळ्या पर्यायाला पसंती दिली. विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद, सरकारविरोधातील नाराजी आणि स्थानिक पातळीवरील असंतोष यांची बेरीजही भाजपच्या विरोधात गेल्याचे मानले जात आहे. त्यामुळे कमी मतदानाच्या या लढतीत प्रशांत किशोर यांनी १९ हजारांहून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवला.
दतियातील चित्रही फार वेगळे नव्हते. येथे उमेदवारीवरून पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली. ज्येष्ठ नेते नरोत्तम मिश्रा यांना बाजूला करून आशुतोष तिवारी यांना संधी देण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये असंतोष निर्माण झाला. काँग्रेसने मात्र घनश्याम सिंह यांना मैदानात उतरवून तुलनेने एकजूट प्रचार केला. या दोन्ही निकालांमधून भाजपसमोर एक समान प्रश्न उभा राहतो—केंद्रीय नेतृत्वाच्या रणनीतीसोबत स्थानिक कार्यकर्ते आणि मतदारांच्या भावनांचा किती विचार केला जात आहे? निवडणुकीत संघटन जितके महत्त्वाचे, तितकाच स्थानिक चेहरा, मतदारांशी संवाद आणि जमिनीवरील नाराजीचा अंदाजही महत्त्वाचा असतो. बांकीपूरचा निकाल भाजपला पराभवापेक्षा मोठा धडा देतोय. सत्ता आणि संघटन ही ताकद असली, तरी मतदाराला गृहीत धरण्याची चूक केली तर ३० वर्षांचा गडही एका निवडणुकीत ढासळू शकतो.
