![]()
मुंबईसह प्रमुख शहरांत दर घसरले; चांदीतही मोठी नरमाई
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ ऑगस्ट २०२६ ।। Gold-Silver Price : सोन्याच्या भावाने गेल्या काही दिवसांत अशी धाव घेतली की, लग्नसराई असो वा गुंतवणूकदाराची हौस—खिशाने आधीच हात टेकले होते. मात्र मंगळवारी बाजाराने थोडा श्वास घेतला आणि सोने-चांदीच्या दरात घसरण झाली. १८ ऑगस्ट रोजी MCX वर सोन्याचा दर सुमारे १,५५,२१२ रुपये प्रति १० ग्रॅम, तर चांदी २,३५,८८६ रुपये किलोवर आली. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात नरमाई दिसली. Reutersच्या वृत्तानुसार, नफावसुली, वाढलेले तेलाचे दर आणि अमेरिकन रोखे उत्पन्नातील वाढ यामुळे सोन्यावर दबाव आला. म्हणजे बाजारात सोने पडले म्हणून सोनाराच्या दुकानात रांगा लागतील, असे मात्र समजण्याचे कारण नाही!
देशांतर्गत बाजारातील चित्रही खरेदीदारांसाठी काहीसे दिलासादायक आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा देशांतर्गत दर सुमारे १,५६,२१० रुपये प्रति १० ग्रॅम, तर २२ कॅरेटचा दर १,४३,१९३ रुपयांच्या आसपास आहे. ९९९ शुद्धतेची चांदी सुमारे २,३९,११० रुपये किलोवर होती. NDTV Profitच्या आकडेवारीनुसार, चांदीचा दर वर्षभरात तब्बल १०९ टक्क्यांहून अधिक वाढलेला आहे. त्यामुळे एक-दोन दिवसांची घसरण पाहून चांदी स्वस्त झाली, असा निष्कर्ष काढणे म्हणजे बाजाराला फारच लवकर माफ करणे होईल.
शहरानुसार दरांमध्ये किरकोळ फरक दिसतो. मुंबई, कोलकाता आणि बंगळुरूमध्ये २४ कॅरेट सोने सुमारे १५,५६७ रुपये प्रति ग्रॅम, तर २२ कॅरेट १४,२७१ आणि १८ कॅरेट सुमारे ११,६७७ रुपये प्रति ग्रॅम आहे. दिल्लीमध्ये २४ कॅरेटचा दर सुमारे १५,५८२, २२ कॅरेट १४,२८६ आणि १८ कॅरेट ११,६९२ रुपये आहे. चेन्नईत २४ कॅरेट सुमारे १५,५६७, २२ कॅरेट १४,२७१ आणि १८ कॅरेट १२,०५१ रुपये आहे. चांदी मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि बंगळुरूमध्ये सुमारे २,४९,९०० रुपये किलो, तर चेन्नई आणि हैदराबादमध्ये सुमारे २,५४,९०० रुपये किलो आहे.
मात्र सोन्याचा बाजार हा भाजी मंडईसारखा नाही की आज स्वस्त दिसले म्हणून उद्या पुन्हा त्याच भावात मिळेल! अमेरिका-इराण तणाव, कच्च्या तेलाचे दर, डॉलरची दिशा, अमेरिकी फेडचे व्याजदर आणि जागतिक महागाई यावर पुढील हालचाल अवलंबून राहणार आहे. सध्या सोन्याच्या घसरणीमागे नफावसुली आणि वाढलेल्या अमेरिकी रोखे उत्पन्नाचाही प्रभाव आहे. त्यामुळे खरेदीचा विचार करणाऱ्यांनी केवळ एका दिवसाचा भाव न पाहता शुद्धता, मेकिंग चार्ज, GST आणि विक्रीवेळी मिळणारा दर यांचा हिशेब करणे अधिक शहाणपणाचे ठरेल.
