१० लाख रोपांनी देश हरित करण्याचा संकल्प !

Spread the love

Loading

संत निरंकारी मिशनच्या ‘वननेस वन’ अभियानाचा सहावा टप्पा; पुणे जिल्ह्यात सहा ठिकाणी १० हजार रोपांची लागवड

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ ऑगस्ट २०२६ ।। झाडे लावण्याचे फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकणे आणि दुसऱ्या दिवशी रोप कुठे गेले याचा पत्ताच नसणे, ही आपल्याकडची पर्यावरणप्रेमाची नेहमीची पद्धत झाली आहे. या दिखाऊ वृक्षारोपणाला छेद देत संत निरंकारी मिशनने ‘वननेस वन – निसर्गासोबत समरसता’ या उपक्रमातून वृक्षलागवडीबरोबरच संवर्धनावर भर दिला आहे. सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या आशीर्वादाने ऑगस्ट २०२१ मध्ये सुरू झालेल्या या अभियानाने आता देशव्यापी स्वरूप घेतले आहे. मिशनच्या माहितीनुसार देशातील विविध राज्यांत सुमारे ३५० वृक्षसमूह उभारण्यात आले असून, ६०० हून अधिक ‘वननेस वन’ ठिकाणी स्वयंसेवक वृक्षांची निगा राखत आहेत.

या अभियानाच्या सहाव्या टप्प्याला रविवार, २३ ऑगस्ट रोजी सुरुवात होणार आहे. देशभरातील ग्रामीण आणि शहरी भागांतील ६३० ठिकाणी एकाच वेळी सुमारे १० लाख रोपांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्हाही या अभियानाचा महत्त्वाचा भाग ठरणार असून भवरापूर, कोरेगाव, खुटबाव, पाषाण-सुतारवाडी, देहूगाव आणि पिंपळगाव-खडकी येथे कार्यक्रम होणार आहेत. या सहा ठिकाणी मिळून सुमारे १० हजार रोपे लावण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, मागील सहा वर्षांत लावलेल्या एक लाखांहून अधिक वृक्षांच्या देखभालीचे कामही याचवेळी केले जाणार असल्याची माहिती पुणे झोनचे इन्चार्ज अशोक अहुजा यांनी दिली आहे.

वृक्षारोपणाच्या नावाखाली खड्डा खोदायचा, रोप लावायचे आणि जबाबदारी संपली, हा प्रकार पर्यावरण वाचवू शकत नाही. खरी परीक्षा रोप लावल्यानंतर सुरू होते. याची जाणीव ठेवून मिशनने प्रत्येक रोपाची तीन ते पाच वर्षे नियमित देखभाल करण्याचा संकल्प केला आहे. पाणी, संरक्षण आणि योग्य निगा मिळाल्यास ही रोपे लघुवनांचे रूप धारण करतील, जैवविविधतेला आधार देतील आणि स्थानिक परिसंस्थेला बळकटी मिळेल. संत निरंकारी मंडळाचे सचिव जोगिंदर सुखीजा यांच्या माहितीनुसार, श्रद्धाळू आणि सेवादलाचे स्वयंसेवक या वृक्षांच्या संरक्षणासाठी सातत्याने कार्यरत आहेत. म्हणजेच वृक्षारोपणाचा उत्सव एक दिवसाचा आणि वृक्षसंवर्धनाची जबाबदारी पाच वर्षांची, असा हा उपक्रम आहे.

आज हवामान बदल, प्रदूषण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास यामुळे पर्यावरणाचा प्रश्न केवळ सरकारी फाईलमध्ये राहिलेला नाही; तो थेट आपल्या घराच्या दारात आला आहे. बाबा हरदेव सिंह जी यांनी दिलेला “प्रदूषण आत असो किंवा बाहेर, दोन्हीही हानिकारक आहेत” हा संदेश याच पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरतो. झाडे लावणे ही सुरुवात आहे; ती जगवणे ही खरी जबाबदारी आहे. संत निरंकारी मिशनचा ‘वननेस वन’ उपक्रम हीच जाणीव समाजात रुजवण्याचा प्रयत्न करीत आहे. शेवटी पृथ्वीवर आपले नाव किती मोठे आहे यापेक्षा, आपल्या सावलीत उद्या किती माणसे आणि किती जीव विसावतील, हे अधिक महत्त्वाचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *