![]()
शतकांची परंपरा आता देशाच्या नकाशावर; माहूरच्या धार्मिक वैभवाला मोठी प्रतिष्ठा
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ ऑगस्ट २०२६ ।। माहूरच्या रेणुका मातेच्या चरणी अर्पण होणाऱ्या तांबूल प्रसादाला आता केवळ भक्तीची नव्हे, तर अधिकृत ओळखीचीही मोहोर मिळाली आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र माहूरगडावरील श्री रेणुका मातेच्या पारंपरिक तांबूल प्रसादाला भौगोलिक मानांकन अर्थात जीआय टॅग मिळाला आहे. शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेला मिळालेली ही मान्यता माहूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवासाठी महत्त्वाची मानली जात आहे. श्रद्धेच्या गोष्टीला सरकारी शिक्का मिळाला की तिचे महत्त्व वाढतेच; पण खरी कसोटी आता या परंपरेची शुद्धता आणि अस्सलपणा टिकवण्याची आहे.
रेणुका मातेला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केल्यानंतर तांबूल प्रसाद देण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. नागवेलीची निवडक पाने, काथ, जायफळ, सुपारी, बडीशेप, लवंग, वेलची, खोबरे, काजू, बदाम, केशर अशा विविध घटकांपासून हा प्रसाद तयार केला जातो. विशेष म्हणजे आधुनिक यंत्रांची मदत न घेता मंदिर परिसरातील सात कारागीर दगडी खलबत्त्यात साहित्य हाताने कुटून त्याची निर्मिती करतात. त्यामुळे या प्रसादाची पारंपरिक चव, सुगंध आणि पद्धत आजही कायम आहे. धार्मिक श्रद्धेबरोबरच हाताने तयार करण्याची ही पद्धतच या प्रसादाचे वेगळेपण अधोरेखित करते.
धार्मिक परंपरेनुसार देवीच्या मुखात एका वेळी सुमारे ५०० नागवेलीच्या पानांचा विडा अर्पण केला जातो आणि दुसऱ्या दिवशी तो भाविकांना प्रसाद म्हणून वितरित केला जातो. जीआय मानांकनामुळे या प्रसादाची ओळख आता स्थानिक परिसरापुरती राहणार नाही. केंद्राच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाकडून पारंपरिक उत्पादनांना जीआय मानांकन दिले जाते. देशातील शेकडो उत्पादनांना हा दर्जा मिळाला असून महाराष्ट्रातील अनेक पारंपरिक उत्पादनांनीही या यादीत स्थान मिळवले आहे. त्यामुळे माहूरच्या तांबूल प्रसादाचा समावेश ही स्थानिक परंपरेच्या दृष्टीने उल्लेखनीय बाब ठरते.
मात्र जीआय टॅग मिळाला म्हणजे काम संपले, असे समजणे धोकादायक ठरेल. परंपरेचे व्यापारीकरण करताना तिचा आत्मा हरवू नये, ही खरी जबाबदारी मंदिर प्रशासन आणि संबंधित कारागिरांची आहे. प्रसादाची पारंपरिक कृती, स्वच्छता, घटकांची गुणवत्ता आणि अस्सलपणा यावर काटेकोर लक्ष ठेवावे लागेल. माहूरला येणाऱ्या लाखो भाविकांसाठी हा प्रसाद श्रद्धेचा विषय आहे; त्यामुळे त्याची ओळख केवळ ‘जीआय उत्पादन’ म्हणून नव्हे, तर पिढ्यान्पिढ्या जपलेल्या धार्मिक वारशाच्या रूपातच टिकली पाहिजे. रेणुका मातेच्या तांबूल प्रसादाला मिळालेला हा मान म्हणजे माहूरच्या संस्कृतीला मिळालेला सन्मान आहे.
