![]()
थॉमस कपलान यांचा ५० हजार डॉलरचा अंदाज; मात्र ‘टाइमलाइन’ नसल्याने गुंतवणूकदारांनी सावध राहण्याची गरज
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ सप्टेंबर २०२६ ।। सोन्याच्या दरात थोडे करेक्शन झाले की बाजारात लगेच ‘तेजी संपली’चा ढोल वाजवला जातो. पण आता एका अब्जाधीशाच्या भाकिताने तो ढोलच सोन्याचा झाला आहे! Electrum Groupचे चेअरमन थॉमस कपलान यांनी सोन्याचा भाव भविष्यात तब्बल ३० हजार ते ५० हजार डॉलर प्रति औंस जाऊ शकतो, असा अत्यंत धाडसी अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, सध्याच्या पातळीपासून सोन्यात आणखी जवळपास दहापट वाढ होणे केवळ शक्यच नव्हे, तर अपरिहार्य आहे. मात्र, या भाकिताचा अर्थ उद्यापासून सोनं १५ लाख रुपये होणार, असा अजिबात नाही—हीच गोष्ट सामान्य खरेदीदारांनी सर्वप्रथम लक्षात ठेवली पाहिजे.
सध्याचा आंतरराष्ट्रीय सोन्याचा भाव सुमारे ४,५०० ते ४,६०० डॉलर प्रति औंसच्या आसपास असताना कपलान यांनी ५० हजार डॉलरपर्यंतचा अंदाज मांडला. जर भविष्यात सोनं खरोखरच ५० हजार डॉलर प्रति औंसवर गेले आणि डॉलरचा दर साधारण ९५ रुपये धरला, तर गणितानुसार भारतीय बाजारात १० ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे १५ लाख रुपयांच्या आसपास जाऊ शकते. पण हे गणित आहे, हमीपत्र नाही! प्रत्यक्ष भारतीय दरात आयात शुल्क, कर, रुपयाचा विनिमय दर आणि स्थानिक प्रीमियम यांसारख्या अनेक घटकांचा परिणाम होतो.
महत्त्वाची बाब म्हणजे थॉमस कपलान यांनी या ५० हजार डॉलरच्या लक्ष्याला कोणतीही निश्चित कालमर्यादा दिलेली नाही. अल्पकालीन घसरण किती होईल किंवा सध्याचे करेक्शन कुठे थांबेल, याबाबत त्यांनी स्वतः अनिश्चितता व्यक्त केली आहे. मात्र, मध्यम आणि दीर्घकालीन काळात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ होईल, असा त्यांचा विश्वास आहे. त्यांनी सध्याच्या घसरणीची तुलना १९८७ मधील अमेरिकी शेअर बाजारातील ‘ब्लॅक मंडे’सारख्या मोठ्या करेक्शनशी केली आहे. त्यांच्या मते, मोठ्या तेजीच्या प्रवासात जोरदार घसरणीही येतात.
मग प्रश्न उरतो—सोनं खरेदी करण्याची ही शेवटची संधी आहे का? त्याचे उत्तर सरळ आहे—कोणाकडेही भविष्य पाहण्याचा आरसा नाही. कपलान यांचे भाकित बाजारातील एका प्रभावशाली गुंतवणूकदाराचे मत आहे; तो अधिकृत दराचा अंदाज नाही. सोन्याची मागणी, केंद्रीय बँकांची खरेदी, व्याजदर, महागाई, युद्धजन्य परिस्थिती आणि डॉलर-रुपया यांचा दरावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे ‘१५ लाख होणार’ या मथळ्याला घाबरून किंवा मोहात पडून धावपळीत खरेदी करणे शहाणपणाचे नाही. सोन्याचा झगमगाट कायम असला, तरी गुंतवणुकीत डोळे दिपवून नव्हे; डोळे उघडे ठेवून निर्णय घ्यावा लागतो!
