![]()
१९७१ पासून उत्सवाबरोबर समाजसेवेचा वसा; श्री अष्टविनायक मित्रमंडळ आणि महिला मंडळाचा सर्वधर्मसमभावाचा संदेश
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ सप्टेंबर २०२६ ।। पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर परिसरात श्री अष्टविनायक मित्रमंडळ आणि श्री अष्टविनायक महिला मंडळ यांनी गणेशोत्सवाला केवळ दहा दिवसांचा उत्सव न ठेवता सामाजिक बांधिलकीचे व्यासपीठ बनवले आहे. १९७१ मध्ये सुरू झालेल्या या मंडळाची यंदा ५६ वर्षांची सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा पूर्ण होत आहे. ‘वल्लभनगरचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रमांसोबत सामाजिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक उपक्रम राबविले जातात. रक्तदान शिबिरे, गरजू आणि गरीब नागरिकांना मदत, महिला दिनाचे कार्यक्रम, स्वातंत्र्य दिन, शिवजयंती, दहीहंडी, दसरा, खाद्य उपक्रम तसेच लहान मुलांसाठी खेळ आणि मनोरंजनाचे कार्यक्रम अशा विविध उपक्रमांमधून मंडळाने परिसरातील नागरिकांना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. उत्सव संपला की काम संपले, अशी भूमिका न घेता वर्षभर सामाजिक सहभागाची परंपरा जपण्याचा मंडळाचा दावा आहे.

गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत वल्लभनगरचा राजा येथे धार्मिक वातावरणासोबत सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल असते. पहिल्या दिवसापासून विसर्जनाच्या अखेरच्या दिवसापर्यंत महिला, पुरुष, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचा उत्स्फूर्त सहभाग असल्याचे मंडळाने सांगितले आहे. भव्य ढोल-ताशा पथकाबरोबरच श्री अष्टविनायक महिला मंडळाचा लेझिम कार्यक्रम हे उत्सवाचे विशेष आकर्षण ठरते. सुमारे ५० महिलांचा या कार्यक्रमात सहभाग असतो. सार्वजनिक गणेशोत्सव म्हटला की केवळ सजावट, रोषणाई आणि मिरवणूक यांवर भर देण्याची प्रथा दिसते; मात्र त्यासोबत रक्तदान, गरजूंना मदत आणि नागरिकांना जोडणारे कार्यक्रम उभे करण्याचा प्रयत्न या मंडळाकडून केला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे उत्सवाच्या झगमगाटापलीकडे सामाजिक सहभागाची बाजूही येथे अधोरेखित होते.
या मंडळाची आणखी एक ठळक भूमिका म्हणजे सर्वधर्मसमभाव. जात, धर्म किंवा सामाजिक भेद न करता सर्व नागरिकांनी एकत्र येऊन उत्सव साजरा करावा, अशी मंडळाची भूमिका आहे. मंडळाच्या माहितीनुसार हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन तसेच विविध समाजातील नागरिक गणेशोत्सवाच्या उपक्रमांमध्ये सहभागी होतात. “सर्वांना सोबत घेऊन, सर्वांसाठी उत्सव आणि समाजासाठी कार्य” हीच आपली विचारधारा असल्याचे श्री अष्टविनायक मित्रमंडळ आणि श्री अष्टविनायक महिला मंडळ सांगतात. वल्लभनगर परिसरातील सामाजिक सलोखा वाढवणे, नव्या पिढीला सांस्कृतिक उपक्रमांशी जोडणे आणि उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणे, हा या ५६ वर्षांच्या प्रवासाचा गाभा असल्याचे मंडळाचे म्हणणे आहे. अखेरीस गणेशोत्सवाचा खरा अर्थ मोठ्या आवाजात नसून मोठ्या मनाने एकत्र येण्यात आहे, हेच या परंपरेचे वेगळेपण ठरते.
