महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ सप्टेंबर २०२६ ।। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात लोणावळा पोलिसांनी दाखल केलेल्या ५,०५३ पानी दोषारोपपत्रातून तपासाचे अनेक धागे समोर आले आहेत. सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हांगे यांच्यावर खून आणि गुन्हेगारी कटाचे आरोप ठेवण्यात आले असून, तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. दोषारोपपत्रात ८० ते ८५ साक्षीदारांचा उल्लेख असल्याचे वृत्त आहे.
१८ जून २०२६ रोजी लोहगडावर केतन अग्रवालचा दरीत पडून मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघात मानला गेला; मात्र पोलिसांच्या तपासात हा अपघात नसून नियोजित हत्या असल्याचा आरोप करण्यात आला. पोलिसांच्या मते, सिया गोयलने केतनला वाढदिवसाच्या निमित्ताने लोहगडावर आणले, तर चेतन चौधरी आधीच दुसऱ्या मार्गाने गडावर पोहोचला होता. ‘माही’ नावाच्या बनावट इन्स्टाग्राम खात्याचा वापर करून केतनला लोहगडावर आणण्यात आल्याचेही तपासात समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
या प्रकरणात आता सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची संख्या. दोषारोपपत्रात तीन जणांनी केतनला दरीत ढकलले जात असल्याचे पाहिल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय, कटाची माहिती असलेले आणि आरोपींना तो कट सोडण्याचा सल्ला देणारे आणखी दोन जण सरकारी साक्षीदार झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. एका व्यक्तीशी केतनला इजा करण्यासाठी संपर्क करण्यात आला होता; मात्र त्याने या योजनेपासून दूर राहत पोलिसांना माहिती दिल्याचे तपासात नमूद आहे.
आधी अपंग करण्याचा विचार; नंतर हत्येचा आरोप
केतन अग्रवाल प्रकरणातील नव्या खुलाशांनी सुरुवातीच्या कटाचे स्वरूपही अधिक स्पष्ट केले आहे. पोलिसांच्या तपासानुसार, सुरुवातीला केतनला ठार करण्याऐवजी गंभीर दुखापत करून त्याला अपंग करण्याचा विचार करण्यात आला होता. त्यासाठी बाहेरील व्यक्तीशी संपर्क करण्यात आला; मात्र त्या व्यक्तीने या कटाला विरोध केला. पुढे आरोपींनी स्वतःच योजना राबविल्याचा आरोप दोषारोपपत्रात करण्यात आला आहे.
लोहगड निवडण्यापूर्वी परिसराची रेकी करण्यात आल्याचेही तपासात नमूद आहे. सिया आणि चेतनने लोणावळ्यातील विविध ठिकाणांची पाहणी केली आणि अखेर लोहगडाची निवड केली, असा पोलिसांचा दावा आहे. हत्येपूर्वी कथित कटाची रंगीत तालीम केल्याचेही तपासात समोर आले आहे.
केतनला खाली ढकलण्याच्या क्षणी सिया आणि चेतनची भूमिका काय होती, याबाबत दोषारोपपत्रात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सियाने केतनला धक्का दिल्यानंतर चेतननेही शारीरिक बळाचा वापर केल्याचा पोलिसांचा दावा आहे. मात्र, या सर्व आरोपांवर अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेतच होणार आहे.
