विनर्स अकॅडमीवर आळंदी नगरपरिषदेची कारवाई; व्यवसाय परवाना आणि NOC नसल्याचे अभिलेखातून स्पष्ट
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ ऑक्टोबर २०२६ ।। रायगडच्या दिवेआगर समुद्रकिनारी सहलीसाठी गेलेल्या आळंदीतील विनर्स अकॅडमीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याने आळंदी शहरावर शोककळा पसरली आहे. अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या या सहलीत मोठा समूह सहभागी झाला होता. समुद्रात उतरलेल्या विद्यार्थ्यांना पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. स्थानिक नागरिक, पोलिस आणि बचाव पथकाने तातडीने मदतकार्य केले; मात्र आठ विद्यार्थ्यांना वाचवता आले नाही. मृत विद्यार्थ्यांमध्ये यश किरण वानखेडे, सोहम तुकाराम भांडवलकर, तन्मय दत्तात्रय वाहिले, कौस्तुभ संदीप दौंड, कैवल्य सतीश वासनकर, राजवीर युवराज वहिले, प्रणव रामदास बनसोडे आणि सुमीत भरत अहिरे यांचा समावेश आहे.
दुर्घटनेचे दुःख ताजे असतानाच आळंदी नगरपरिषदेने विनर्स अकॅडमीवर थेट सीलची कारवाई केली. नगरपरिषदेच्या पथकाने श्री. नारायण हरिभाऊ दस यांच्या मालकीच्या जुना ११३७, नवीन LAN00001729 या मालमत्तेची पाहणी केली. या ठिकाणी विनर्स अकॅडमीचे कोचिंग वर्ग सुरू असल्याचे आढळले. मात्र नगरपरिषदेच्या अभिलेखांची तपासणी केली असता संबंधित संस्थेने आवश्यक व्यवसाय परवाना किंवा ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) घेतल्याची नोंद आढळली नाही, अशी माहिती नगरपरिषदेने दिली. म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या संस्थेच्या दारावरच नियमांचा दिवा विझलेला होता. दुर्घटनेनंतर ही बाब समोर आल्याने खासगी क्लासेसच्या नियमनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या आदेशानुसार कर विभाग प्रमुख श्रीमती सीमा चारवे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पोलिस बंदोबस्तात विनर्स अकॅडमीची मिळकत सील केली. शहरातील इतर कोचिंग क्लासेस आणि आस्थापनांचीही परवानग्या तपासण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. आवश्यक परवाने, NOC आणि कायदेशीर बाबी पूर्ण करूनच शैक्षणिक संस्था चालवाव्यात, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा नगरपरिषदेने दिला आहे. मुलांना शिकवताना नियमांचे धडे देणाऱ्या संस्थांनी स्वतः नियमांची परीक्षा उत्तीर्ण होणेही तितकेच आवश्यक आहे.
