पुणे पदवीधर जागा गमावणे राष्ट्रवादीचे अपयश

Spread the love

Loading

महायुतीतूनच निवडणूक लढविण्याचा आग्रह; ९ ऑक्टोबरपर्यंत चर्चेची दारे खुली

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ ऑक्टोबर २०२६ ।। मुंबई : पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसची हक्काची होती, मात्र ती पक्षाला मिळवता आली नाही, ही वस्तुस्थिती आहे. चर्चेत आम्ही कमी पडलो आणि हे सामूहिक अपयश मानावे लागेल, अशी स्पष्ट कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ ऑक्टोबर असल्याने अजूनही चर्चेची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. महायुती म्हणूनच ही निवडणूक लढविली जावी, अशी पक्षाची भूमिका असून गरज भासल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा केली जाईल, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. महायुतीने पुणे पदवीधरची जागा भाजपला देण्याचा निर्णय घेतला असून डॉ. स्मिता जाधव या महायुतीच्या उमेदवार आहेत.

राष्ट्रवादीचा दावा केवळ जागेपुरता नव्हता, तर मागील निवडणुकीच्या राजकीय वारशावरही आधारित होता. पाच वर्षांपूर्वी अरुण लाड पुणे पदवीधर मतदारसंघातून विजयी झाले होते. नंतरच्या राजकीय घडामोडींमध्ये लाड यांचा राजकीय प्रवास बदलला असला, तरी त्या वेळी झालेले मतदान राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर झाले होते, असा तटकरेंचा युक्तिवाद आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला मिळावी, असा आग्रह सुरुवातीपासून कायम होता. मात्र महायुतीच्या जागावाटपात भाजपने पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक या दोन्ही जागांवर दावा कायम ठेवला आणि अखेर पुणे पदवीधरची जागा भाजपच्या वाट्याला गेली. तटकरे यांनी मात्र या निर्णयामुळे राष्ट्रवादीची वाटाघाटीची ताकद कमी झाली, असा अर्थ काढणे चुकीचे ठरेल, असे सांगितले.

दरम्यान, जागावाटपाचा वाद आता केवळ बंद दाराआडचा राहिलेला नाही. पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपकडून डॉ. स्मिता जाधव, तर शिवसेनेकडून सचिन सानप यांनी अर्ज दाखल केल्याने महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप माने यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ९ ऑक्टोबरपर्यंत कोण माघार घेतो आणि महायुतीची एकत्रित भूमिका काय ठरते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मतदान २३ ऑक्टोबरला होणार असून २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. जागा गमावल्याची खंत व्यक्त करणाऱ्या तटकरेंसमोर आता पक्षाचा दावा टिकवण्याबरोबरच महायुतीतील समन्वय राखण्याचे आव्हान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *