भडक रंग, बनावट चांदीचा वर्ख आणि शिळ्या खव्यापासून सावध राहा; तुकाराम मुंढे यांचा इशारा, राज्यभरात ९५४ परवाने निलंबित
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दिवाळीच्या गोडधोडात भेसळीचा कडवटपणा मिसळू नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, सणाच्या बाजारात आकर्षक रंग, चकचकीत वर्ख आणि स्वस्त दराचे आमिष दाखवून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मिठाई खरेदी करताना नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. १ सप्टेंबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान राज्यात ९,६६७ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. नियमभंग करणाऱ्या ४,६०३ आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या, ९५४ परवाने निलंबित करण्यात आले, तर ८,८३५ अन्ननमुने तपासणीसाठी घेण्यात आले. या मोहिमेत ३९८ टन अन्नसाठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत तब्बल ६४ कोटी ४५ लाख रुपये असल्याची माहिती मुंढे यांनी दिली. ही आकडेवारी केवळ कारवाईचे यश सांगत नाही, तर बाजारातील अन्नसुरक्षेची गंभीर स्थितीही उघड करते.
दिवाळीच्या विशेष मोहिमेत १५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान ३,३३२ आस्थापनांची तपासणी, १,५०१ नोटिसा, ३२६ परवाने निलंबित आणि १५ परवाने रद्द करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. परराज्यांतून येणारा खवा, मावा, दूध, पनीर, खाद्यतेल आणि कृत्रिम खाद्यरंग यांची तपासणी करण्यात आली आहे. मुंढे यांनी ग्राहकांना नामांकित व लेबल असलेली मिठाई खरेदी करण्याचा, उत्पादनाची तारीख आणि वापरण्याची अंतिम मुदत तपासण्याचा सल्ला दिला आहे. अतिशय भडक रंगाची मिठाई टाळावी, दोन दिवसांपुरतीच मिठाई खरेदी करावी आणि संशयास्पद पदार्थ आढळल्यास एफडीएकडे तक्रार करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. सोन्या-चांदीचा वर्ख लावलेल्या मिठाईबाबतही विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
मिठाई विक्रेत्यांनी स्वच्छता, योग्य साठवणूक आणि अन्नसुरक्षेचे नियम पाळलेच पाहिजेत, असा स्पष्ट इशारा मुंढे यांनी दिला आहे. मुदत संपलेले पदार्थ विकणे, खराब अन्नाची पुनर्पॅकिंग करून विक्री करणे किंवा खाद्यतेलाचा वारंवार पुनर्वापर करणे हा ग्राहकांच्या आरोग्याशी केलेला गंभीर अपराध आहे. खाद्यतेलाच्या पुनर्वापरावर बंदी घालणारा एफडीएचा आदेशही याच पार्श्वभूमीवर महत्त्वाचा आहे.
प्रश्न एवढाच की, छापे, जप्ती आणि परवाने निलंबित करण्याच्या कारवाईनंतरही भेसळ बाजारात पोहोचत असेल, तर नियंत्रण यंत्रणेची पकड किती प्रभावी आहे? ग्राहकांनीही स्वस्ताईच्या मोहात आरोग्य गहाण ठेवू नये. कारण दिवाळीचा आनंद काही दिवसांचा असतो; पण भेसळयुक्त अन्नाचे दुष्परिणाम दीर्घकाळ भोगावे लागू शकतात.
