मराठा आरक्षण : MPSC परीक्षेचा तिढा कायम; मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ

Spread the love

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – प्रतिनिधी – दि. ९ ऑक्टो. – मुंबई -येत्या रविवारी होणारी राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा घ्यायची की नाही याचा तिढा अजूनही कायम आहे. गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मराठा संघटनांनी मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात निकाल लागेपर्यंत ही परीक्षा न घेण्याचा पुनरुच्चार केला. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यावर ठोस निर्णय जाहीर न केल्याने ही बैठक निष्फळ ठरली.

एमपीएससीच्या दोनशे जागांसाठी ११ ऑक्टोबरला परीक्षा जाहीर करण्यात आली आहे. मात्र मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिल्यामुळे निकाल लागेपर्यंत परीक्षा घेण्यास मराठा संघटनांनी विरोध केला आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा संघटनांची मते जाणून घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. यावेळी खासदार संभाजीराजे आणि मराठा संघटनांच्या अन्य प्रतिनिधींनी राज्य सरकारकडे आपली भूमिका मांडली.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर नोकरभरती करणार नसल्याचे राज्य सरकारने सांगितले होते. मात्र दहा हजारपेक्षा जास्त पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. आता एमपीएससीची निवड परीक्षा घेतली जात आहे. हा मराठा समाजावर अन्याय असल्याचे संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

राज्य सरकार एमपीएससीची निवड परीक्षा घेत आहे. मात्र यापूर्वी ज्यांची निवड झाली, त्यांना नियुक्‍ती देत नाही. मग नवीन पदे भरण्याची घाई का? असा सवाल यावेळी करण्यात आला. सरकारी नोकर भरतीत मराठा समाजाच्या हिताचे रक्षण करावे अशी मागणीही करण्यात आली. मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण नको आहे. राज्य सरकारने एसईबीसी आरक्षणावर ठाम राहावे अशीही मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी आमदार विनायक मेटे यांच्याशीही या मुद्द्यावर चर्चा केली. यावेळी निवड परीक्षेची वयोमर्यादा वाढविण्याची मागणीही करण्यात आली.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सरकार मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले. तसेच एमपीएससी परीक्षेबाबत आपण दोन दिवसांत निर्णय घेऊ, असे सांगितले. त्यामुळे ही परीक्षा होणार की नाही हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

या बैठकीनंतर खासदार संभाजीराजे यांनी मराठा समाजाची भावना मुख्यमंत्र्यांसमोर सविस्तरपणे सांगितली. एमपीएससी परीक्षेचा गोंधळ सुरू आहे. जुन्या परीक्षा झाल्या, त्यांची नियुक्‍ती का होत नाही, याची विचारणा केली. त्यांना आमचे म्हणणे पटले आहे. परीक्षा ते पुढे ढकलतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. मात्र, सकल मराठा समाजाचे आंदोलन सुरूच राहणार आहे, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *