कोरोना’वरच्या उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये न जाता फडणवीसांनी निवडलं सरकारी हॉस्पिटल ; आधीच दिली होती सूचना

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – प्रतिनिधी – दि. २५ऑक्टो – मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. फडणवीस यांनीच स्वत: ट्विट करत त्याची माहिती दिली आहे. काही लक्षणे दिसत असल्याने त्यांनी टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यात त्यांना COVID-19ची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर कुठल्याही मोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये न जाता त्यांनी सेंट जॉर्ज या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला. सध्या याच हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कोरोना आढावा दौऱ्यावर असतानाच फडणवीस बोलताना म्हणाले होते की, कोरोनापासून बचावासाठी मी सगळी काळजी घेतो आहे. मात्र कोरोनाची बाधा झालीच तर मला उपचारासाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात यावं अशी सूचना मी सहकाऱ्यांना दिली आहे. मुंबईत सीएसटी रेल्वे स्थानकाच्या मागच्या बाजुला सेंट जॉर्ज हॉस्पिटल असून उपचारासाठी त्याची ख्यातीही आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस लवकर बरे होतील अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.

देवेंद्र फडणवीस साहेब काळजी घ्या आणि कोरोनावर मात करुन लवकर बरे व्हा अशा शुभेच्छा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांना दिल्या आहेत.फडणवीस हे गेली अनेक दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. आणि नंतर ते बिहारमध्येही प्रचारासाठी गेले होते. गेले काही दिवस ते ओला दुष्काळाच्या पाहणीसाठी दौऱ्यावर होते. सुरूवातीच्या टप्प्यात कोरोनाच्या आढाव्यासाठी फडणवीस यांनी विभागवार दौरे केले. राज्याच्या सगळ्या भागात जाऊन त्यांनी हॉस्पिटल्सला भेटी देत सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.

नंतर मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढलं होतं त्यामुळे फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याची पाहणी केली. याच काळात त्यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी म्हणून नियुक्त केलं होतं.त्यानंतर ते दोन वेळा बिहारमध्येही गेले होते. बिहारच्या दौऱ्यावर असतानांच महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली त्यामुळे ते तातडीने राज्यात परत आले आणि दौऱ्यावर निघाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *