महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ५ नोव्हेंबर – मुंबई – राज्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून गारठा वाढत असल्याने थंडीची चाहूल लागली आहे. राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आता थंडीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. येत्या काही दिवसांत राज्यात थंडी काही प्रमाणात वाढणार आहे. बुधवारी (ता. ४) सकाळी आठपर्यंत सर्वांत कमी तापमान चंद्रपूरमध्ये १२.२ अंश सेल्सिअसची नोंदले गेले.
पुण्यात ३१ ऑक्टोबरला १५.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. त्यानंतर किमान तापमानाचा पारा १८.८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला. गेल्या तीन दिवसांमध्ये दोन अंश सेल्सिअसने तापमान कमी होऊन, ते बुधवारी सकाळी साडेआठ वाजता १५.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुढील दोन दिवसांमध्ये आकाश निरभ्र रहाणार आहे. त्याचवेळी कमाल तापमान ३१ आणि किमान १५ ते १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. शहरातील आर्द्रतेचे प्रमाण ९३ टक्क्यांपर्यंत आहे.
राज्यातील किमान तापमान
मुंबई २५, रत्नागिरी २२.५, डहाणू २३.५, पुणे १५.१, जळगाव १५.२, कोल्हापूर १९.४, मालेगाव १७.४, नाशिक १५.४, सांगली १८.३, सातारा १६.५, सोलापूर १६.४, औरंगाबाद १६.३, बीड १६.९, परभणी १४, नांदेड १७, अकोला १५.६, अमरावती १३, बुलडाणा १६.६, चंद्रपूर १२.२, गोंदिया १३.६, नागपूर १२.८, वर्धा १४.४.
राज्यातील हवामान अंदाज
हवामान खात्याच्या मराठवाडा उपविभागातील औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर येथे आणखी घट होण्याची शक्यता आहे.
विदर्भात अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वाशीम या भागात जास्त थंड वारे वाहतील. त्यामुळे या भागातही अजूनही थंडी वाढण्याची शक्यता आहे.
नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली येथे किमान तापमानात कमालीची घट होईल. कोकणात पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, उपनगर, ठाणे येथे थोड्या प्रमाणात थंडी वाढेल. पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, नगर या भागांमध्ये थंडीची तीव्रता वाढेल.