महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ९ डिसेंबर – काही महिन्यापूर्वी करोना विषाणूनं जगभरात थैमान घालण्यास सुरूवात केली. अद्यापही करोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभरात कायम आहे. अनेक देश यावरील लस विकसित करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. परंतु अशा परिस्थितीतही चीननं अमेरिका आणि त्यानंतर भारतातून करोना विषाणूचा प्रादुर्भाव पसरल्याचा आरोप केला होता. वुहानमध्ये करोनाचा प्रादुर्भाव पसरण्यापूर्वी इटलीसोबतच जगाच्या इतर भागात करोना विषाणू पसरला असल्याचा दावाही चीननं केला होता. परंतु आता करोनाच्या प्रसारासाठी चीननं ऑस्ट्रेलियाला जबाबदार धरलं आहे.
दरम्यान, करोना विषाणूचा प्रसार ऑस्ट्रेलियातून झाला असल्याचा आरोप आता चीननं केला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये फ्रोझन मीटवर काही चाचण्या करण्यात आल्या. चीन सातत्यानं फ्रोझन मीटवरून न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियासारख्या देशांवर करोना पसवल्याचा आरोप करत आला होता. परंतु हे सिद्ध करण्यास मात्र चीनला अपयश आलं आहे.
चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार करोना विषाणूचा प्रादुर्भाव चीन नाही तर ऑस्ट्रेलियातून झाल्याचा दावा करण्यात आला आहे. इतकंच नाही तर फ्रोझन फूडच्या माध्यमातून हा विषाणू चीनच्या वुहान बाजारापर्यंत पोहोचल्याचाही दावा करण्यात आला आहे. यापूर्वी अनेकदा चीननं कोणत्याही पुराव्यांशिवाय फ्रोझन फूडवरून अन्य देशांवर करोनाचा प्रादुर्भाव पसवल्याचा आरोप केला आहे.
हे दावे सिद्ध करण्यासाठी अधिक पुराव्यांची गरज असल्याचंही ग्लोबल टाईम्सनं म्हटलं आहे. यापूर्वीदेखील चीननं केलेल्या दाव्यांप्रमाणेच यावेळीही आरोप सिद्ध करण्यासाठी चीनकडे कोणत्याही प्रकारची माहिती नाही. अनेक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार करोना महासाथीचा प्रादुर्भाव चीनमधील वुहान मार्केटमधूनच सुरू झाल्याचं सांगण्यात येत आहे. या ठिकाणी मांस विक्री मोठ्य़ा प्रमाणात केली जाते.