शाळा कधी सुरु होणार? वर्षा गायकवाड यांनी दिली महत्त्वाची बातमी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १० डिसेंबर – पहिली ते आठवीचे वर्ग सुरु करण्याबाबतचा निर्णय तुर्तास तरी नाही, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. कोरोनाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन लहान मुलं करु शकणार नाहीत. सध्या तरी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शाळा सुरू करण्यासंदर्भात कोणताच निर्णय घेतला नसल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या. मात्र नववी ते बारावी पर्यंतचेच वर्ग सुरू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. संबंधित भागातील परिस्थिती पाहूनच निर्णय घेऊ असंही त्यांनी सांगितलं.

राज्यात अनेक ठिकाणी नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग नियमित सुरु झालेले आहेत. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोणताही विद्यार्थी किंवा शिक्षक कोरोना बाधित झाल्याचं प्रकरण समोर आलेलं नाही, ही अतिशय सकारात्मक बाब आहे. यापुढे स्थानिक जिल्हा प्रशासनाचा जो अहवाल येईल, त्या अहवालानुसार इतर जिल्ह्यातील शाळा सुरु करता येतील का, यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे, शाळा सुरु करताना सर्वात आधी आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग पुन्हा सुरु करण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या सूचनेनुसार नववी ते बारावीचे वर्ग सुरु होतील.

पहिली ते आठवीचे मुलं सामाजिक अंतर किंवा आरोग्याच्या इतर सूचना पाळतीलच असं नाही, यापेक्षा नववी ते बारावीची मुलं वयाने मोठी असल्याने त्यांच्याकडून ते करून घेणे शक्य आहे. म्हणून आम्ही सध्या पहिली ते आठवीपर्यंत शाळा उघडण्याच्या बाबतीत कोणतीही भूमिका मांडलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *