मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर लसीकरण मोहिमेत करावा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १० डिसेंबर – कोविड १९ लस लवकरच उपलब्ध होण्याची आशा असून लशीकरणाच्या मोहिमेत मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये बोलताना व्यक्त केली.त्यांनी सांगितले की, फाइव्ह जी मोबाइल सेवा ठरावीक कालमयार्देत भारतात उपलब्ध होईल. त्यामुळे डेटा म्हणजे माहितीचा वेग वाढणार आहे. अनेक जीबी क्षमतेपर्यंत माहितीची देवाणघेवाण वेगाने करणे शक्य होणार आहे.

इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये त्यांनी सांगितले की, मोबाइल तंत्रज्ञानातून लाखो लोकांना कोट्यवधी डॉलर्सचा फायदा झाला आहे. रोख रकमेशिवाय व्यवहार करणे शक्य झाले आहे. टोल नाक्यांवरही संपर्कहीन टोल वसुली सेवा शक्य झाली आहे. मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर लशीकरणाची मोहीम राबवण्यात करण्यात यावा. पण तो कसा करावा याचे स्पष्टीकरण त्यांनी केले नाही. सध्या भारतात फायझर, अस्ट्राझेनेका, भारत बायोटेक व सीरम या कंपन्यांनी लशीच्या आपत्कालीन वापराचा परवाना मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. मोदी यांनी सांगितले, की फाइव्ह जी तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यासाठी आगामी काळात एकजुटीने काम करावे लागेल. त्यातून लाखो भारतीयांचे सक्षमीकरण होणार आहे. ईशान्येकडील राज्ये, महत्त्वाकांक्षी जिल्हे, डाव्या नक्षलवादाचा प्रभाव असलेले जिल्हे, लक्षद्वीप बेटे या ठिकाणी आम्ही मोबाइल यंत्रणेच्या माध्यमातून दूरसंचार व्यवस्थेवर भर दिला आहे. स्थिर ब्रॉडबँड जोडण्या व सार्वजनिक वायफाय क्षेत्रे निर्माण करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *