महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १९ डिसेंबर -रेल्वे सेवा केव्हा सामान्य होईल याची तारीख आताच सांगू शकत नाही. कोरोना साथीच्या आजारामुळे मेल-एक्सप्रेस रद्द कराव्या लागल्याने प्रवासी उत्पन्नात यंदा 87 टक्के तूट आली असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व सीईओ व्ही.के.यादव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रवासी वाहतूक क्षेत्रात झालेल्या तोटय़ाची भरपाई रेल्वेने मालवाहतुकीतून केली आहे. मालवाहतुकीतून मिळणाऱया उत्पन्नाने गेल्यावर्षीचा आकडा ओलांडण्याची शक्यता आहे. यंदा डिसेंबरमध्येच मालवाहतुकीने गेल्यावर्षीच्या उत्पन्नाच्या 97 टक्के लक्ष्य गाठले असल्याचे यादव यांनी स्पष्ट केले. प्रवासी वाहतुकीतून यंदाच्या आर्थिक वर्षांत 4,600 कोटी उत्पन्न मिळाले असून मार्च 2021 पर्यंत ते 15,000 कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी ही कमाई 53,000 कोटी रूपये इतकी झाली होती. देशभरात सध्या 1089 स्पेशल गाडय़ा चालू असून त्यांची केवळ 30 ते 40 टक्के इतकीच आसने भरलेली असतात असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोना साथीचे भय अजूनही कायम असून रेल्वे सेवा केव्हा सामान्य होईल याची नक्की तारीख सांगू शकत नाही. संबंधित राज्य सरकारांशी महाव्यवस्थापक स्तरावर बोलणी सुरू असून परिस्थिती पाहूनच यावर निर्णय घेण्यात येईल. परिस्थिती अजूनही सामान्य झालेली नाही. कोलकाता मेट्रोत 60 टक्के सेवा सुरू असून मुंबईत 88 टक्के लोकल सुरू आहेत. तर चेन्नईत 50 टक्के लोकल सुरू आहेत. रेल्वेचे अधिकारी परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून हळुहळू रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात येईल असेही एका प्रश्नाला उत्तर देताना यादव यांनी सांगितले.