महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २८ डिसेंबर – नवीदिल्ली- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहन चालकांच्या ड्रायव्हिंग लायसन्ससह वाहनांसाठी आवश्यक फिटनेस व सर्व प्रकारच्या परवान्यांच्या नूतनीकरणास 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. रविवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला. यामुळे वाहन मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आरटीओ कार्यालयातील गर्दी टाळण्यासाठी 1 फेब्रुवारी 2020 पासून वैधता संपलेल्या वाहन चालकांना ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणासाठी आता 31 मार्च 2021 पर्यंत सूट देण्यात आली आहे. याउलट माल वाहतूक व प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांशी संबंधित फिटनेस, सर्व प्रकारचे परमिट, नोंदणी आणि इतर कागदपत्रांची वैधता संपल्यास कारवाई करू नये, असेही या आदेशात म्हटले आहे. संबंधित वाहन मालकांना 31 मार्च 2021 पर्यंत कागदपत्रांचे नूतनीकरण करता येईल.